Jalna Crime: दादागिरी थांबणार कधी? वाळू माफियांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; थेट डोक्यात वीट घातली अन्...

या घटनेत एका 35 वर्षाच्या तरुणाचा डोक्यात वीट लागून मृत्यू झाला. परमेश्वर सोनुने असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: जालना जिल्ह्यामध्ये वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळत असून वाळू माफियांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे वाळू माफियांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनीही बेदम  मारहाण केल्याचा कुटुंबियांसह नातेवाईकांनी आरोप केला असून तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा अन्यथा मयताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाळू माफियांनी घरामागे साठवलेल्या वाळूमुळे रहदारीसाठी अडचण होत असल्याची तक्रार देण्यासाठी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणासह त्याच्या दोन भावंडांवर वाळू माफियांनी हल्ला केला आहे. या घटनेत एका 35 वर्षाच्या तरुणाचा डोक्यात वीट लागून मृत्यू झाला. परमेश्वर सोनुने असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

जालन्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्यासमोर ही मारहाणीची घटना घडली. या घटनेनंतर जखमीला सुरूवातीला जाफ्राबाद येथे नंतर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान या प्रकरणी जाफ्राबाद पोलिसांनी आरोपी राजू सोनुने आणि विजय सोनुने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

नक्की वाचा- Maharashtra Politics : वर्धापनदिनी शरद पवार गटाला मोठे हादरे; पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते भाजपच्या वाटेवर )

तर वाळू माफियांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात हा तरुण गेलेला असताना वाळू माफियांबरोबरच पोलिसांनीही मारहाण केली त्यामुळे या तरुणाचा उपचारा दरम्यान नाही तर घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करत नाही तोपर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयताच्या नातवाईकांनी घेतला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Advertisement