लक्ष्मण सोळुंके, जालना
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बचत गटातून घेतलेल्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी गेलेल्या तरुणीला 24 तास घरात डांबून ठेवून, लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये तरुणीच्या काकूचाही समावेश आहे.
नवीन जालना शहरातील मोदी खाना परिसरात एका 20 वर्षीय तरुणीसोबत संतापजनक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने लग्नासाठी बचत गटातून पैसे घेतले होते. त्या पैशाचा दर 15 दिवसांनी ती हप्त्या देखील देते. 4 जून रोजी आरोपी शबाना शेख हिने हप्ता घेऊन तरुणीला तिच्या घरी बोलावले.
(वाचा - ढाब्यावाल्याने पार्सलचे पैसे मागितले, त्याने चॉपर काढला; अन् मग... )
तरुणी पैसे घेऊन गेली त्यावेळी तिची बहीण आणि काकी तिथेच उपस्थित होते. हप्त्याचे पैसे दिल्यानंतर आरोपींना तरुणीच्या लहान बहिणीला सोडून दिले आणि तिला थांबायला सांगितलं. पीडित तरुणीने काकूला घरी जाण्याबाबत विचारणा केली असता तिने तिला मारहाण केली आणि तिथेच थांबायला सांगितलं आणि तीही निघून गेली.
शबाना हिचा पती इरफान शेख घरी आल्यानंतर त्याने तरुणीला घरात कोंडून ठेवलं. रात्री तरुणीच्या आईने फोन करुन मुलीला सोडण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी नकार दिला. त्यानंतर आरोपी इरफानने तरुणीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने आरडाओरडा केल्याने इरफानने तिला पुन्हा खोलीत बंद केलं.
(वाचा-शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी)
सकाळी तरुणीने कशीबशी तिथून सुटका करुन पळ काढला. मात्र इरफानने पाठलाग करुन तिला पकडलं आणि मारहाण करुन पुन्हा घरी आणलं. तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. अखेर तरुणीची आई तिथे आली आणि तिने मुलीची सुटका केली.
पीडित तरुणीच्या आईने तरुणीसोबत सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी आरोपी शेख इरफान शेख, शबाना शेख इरफान आणि तरुणीच्या काकूविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करत आहे.