JPMorgan Executive Lorna Hajini: बँकिंग क्षेत्रातील दिग्गज संस्था असलेल्या जेपी मॉर्गन चेस मधील एका महिला उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर एका ज्युनियर पुरुष सहकाऱ्याने अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. लैंगिक अत्याचार, वर्णद्वेषी टिप्पणी आणि करिअर संपवण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यूयॉर्कच्या न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
जेपी मॉर्गन मधील लिव्हरेज्ड फायनान्स विभागाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर लॉर्ना हॅजिनी यांच्यावर एका भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याने हे आरोप केले आहेत. या पीडित कर्मचाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून त्याला 'जॉन डो' असे संबोधले जात आहे. तक्रारीनुसार, हॅजिनी यांनी 2024 पासून या सहकाऱ्याचा छळ करण्यास सुरुवात केली. त्याने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला असता, त्याला अमली पदार्थ दिल्याचा आणि करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा दावा या ज्युनियर सहकाऱ्याने केला आहे.
( नक्की वाचा : Pune News: 65 वर्षांचा नराधम अन् 2 वर्षांची चिमुकली; पुण्यात गोठ्यामध्ये घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार )
धमक्या आणि वर्णद्वेषी वागणूक
दाखल केलेल्या खटल्यानुसार, लॉर्ना हॅजिनी यांनी संबंधित कर्मचाऱ्याला अनेकदा मद्यपानासाठी बोलावले होते. त्याने नकार दिल्यावर 'जर तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत, तर मी तुला उद्ध्वस्त करेन, तू विसरू नकोस की मी तुझी मालक आहे', अशा भाषेत धमकावण्यात आले. इतकेच नाही तर, 'या बँकिंग क्षेत्रात तुझ्यासारख्या भारतीय तरुणाला कोण पुढे जाऊ देईल असे तुला वाटते? जर तू आज रात्री मला खूश केले नाहीस, तर मी तुझे प्रमोशन रोखेन', असे वर्णद्वेषी विधानही त्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बळजबरी आणि अमली पदार्थांचा वापर
पीडित कर्मचाऱ्याने असाही आरोप केला आहे की, त्याला शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त करण्यासाठी हॅजिनी यांनी त्याला गुंगीचे औषध (रोहिपनॉल) दिले होते. एका घटनेत त्या थेट पीडित कर्मचाऱ्याच्या घरी गेल्या आणि तिथेही त्यांनी त्याला लैंगिक आणि वांशिकदृष्ट्या अपमानित केले.
पीडित कर्मचाऱ्याच्या पत्नीबद्दलही त्यांनी अत्यंत हीन दर्जाची टिप्पणी केली होती. जेव्हा पीडित कर्मचारी रडायला लागला, तेव्हा त्याला 'रडणे थांबव, तुझे कोणीही ऐकणार नाही' असे म्हणत गप्प केल्याचे खटल्यात नमूद केले आहे.
( नक्की वाचा : Kohinoor Diamond: 'कोहिनूर' भारताला परत का मिळत नाही? कायदा नाही तर 'हे' आहे हिरा न देण्याचं ब्रिटनचं खरं कारण )
बँकेची भूमिका काय?
या प्रकरणावर लॉर्ना हॅजिनी यांनी त्यांचे वकील आणि न्यूयॉर्क पोस्टच्या माध्यमातून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण संबंधित व्यक्तीसोबत कधीही अशा प्रकारचे वर्तन केले नाही आणि ज्या ठिकाणी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे, तिथे आपण कधी गेलोच नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, मे 2025 मध्ये या कर्मचाऱ्याने बँकेकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, जेपी मॉर्गन बँकेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंतर्गत तपासात या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही. तक्रारदार कर्मचाऱ्याने स्वतः तपासात सहकार्य केले नाही आणि पुरेसे पुरावे दिले नाहीत, असे बँकेचे म्हणणे आहे.
नुकसानभरपाईची मागणी
पीडित कर्मचाऱ्याचे वकील डॅनियल जे. कैसर यांनी सांगितले की, या प्रकारामुळे त्यांच्या अशीलचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हॅजिनी अजूनही बँकेत कार्यरत आहेत, तर पीडित कर्मचाऱ्याला दुसरीकडे नोकरी शोधणे कठीण झाले आहे. या त्रासाबद्दल त्यांनी आर्थिक नुकसानभरपाई, मानसिक छळ आणि प्रतिष्ठेला झालेल्या धक्क्याबद्दल दाव्याची मागणी केली आहे.
लॉर्ना हॅजिनी यांची पार्श्वभूमी
37 वर्षीय लॉर्ना हॅजिनी या गेल्या 15 वर्षांपासून जेपी मॉर्गनमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून फायनान्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी घेतली असून हार्वर्ड बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या बँकेच्या एका महत्त्वाच्या विभागात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.