कर्नाटकातील एका सामान्य वाटणाऱ्या मर्डर मिस्ट्रीचं कनेक्शन कन्नड फिल्म स्टार दर्शन थुगुदीपा आणि अभिनेत्री पवित्रा गौडापर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणात दर्शनला अटक करण्यात आलीय. तर पवित्राची चौकशी करण्यात येत आहे. बंगळुरु पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. फार्मसी कंपनीत काम करत असलेले स्वामी हे चित्रदूर्गचे रहिवाशी होते. स्वामी यांच्या कथित हत्येनंतर त्यांचा मृतदेह बंगळुरुमधील कामाक्षीपाल्या भागातील एका नाल्यात फेकून देण्यात आला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीनं एका सोशल मीडिया पोस्टवर अभिनेत्री पवित्रावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवत होता. पोलिसांच्या संशयाची सुई आता या दोघांभोवती फिरत आहे. या प्रकरणात दर्शनच्या दोन बॉडीगार्ड्सना देखील ताब्यात घेण्यात आलंय. स्थानिक नागरिकांनी हत्येची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरु केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये त्याची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आलीय. या आरोपींनी जबानीमध्ये महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली असून त्यांच्या जबानीच्या आधारेच अभिनेता दर्शनला अटक करण्यात आलीय.
( नक्की वाचा : कन्नड कलाकार दर्शनला हत्या प्रकरणात अटक )
कोण दर्शन थुगुदीपा?
दर्शन थुगुदीपाची दर्शन या नावानं कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. तो निर्माता आणि अभिनेता आहे. कन्नड इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा असलेल्या दर्शननं 2002 मध्ये मॅजेस्टीक या सिनेमातून पदार्पण केलं. त्यानं आत्तापर्यंत कारिया, कलासीपाल्या, गाजा, नवग्रह, सारथी, बूलबूल, यजमाना, आणि रॉबर्टसह अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. दर्शन यापूर्वी काटेरा सिनेमात दिसला होता. 2023 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दर्शननं 2006 साली स्वत:चं थुगदीपा प्रोडक्शन हाऊस सुरु केलं.
दर्शन यापूर्वी देखील वादात सापडला आहे. 2016 साली दर्शनची त्याच्या पत्नीनंच आक्षेपार्ह वर्तनाबद्दल बंगळुरू पोलिसांकडं धाव घेतली होती. तर 2021 साली त्याच्यावर म्हैसुरुमध्ये एका वेटरशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. दर्शननं वेटरला 50 हजार रुपये देऊन हे प्रकरण मिटवल्याचं तेव्हा सांगितलं गेलं होतं.
भरत नाम या कन्नड निर्मात्यानं 2022 दर्शन विरुद्ध तो धमकावत असल्याची तक्रार केली होती. जानेवारी 2023 मध्ये वन विभागानं दर्शनच्या फार्म हाऊसवर छापा टाकला होता. त्यावेळी दर्शननं त्यावर अवैध ताबा कब्जा केलाय, असा आरोप करण्यात आला होता.
( नक्की वाचा : बॉलिवूड अभिनेत्याला सीरिअल किलर समजून घेरलं, पळ काढला नसता तर गेला असता जीव )
कोण आहे पवित्रा गौडा ?
कन्नड कलाकार पवित्रा गौडा यावर्षी जानेवारीमध्ये दर्शनसोबतचा एक फोटो शेअर केल्यानंतर चांगलीच चर्चेत आली होती. 'आम्ही एका दशकापासून एकत्र आहोत. संपूर्ण आयुष्य अजून बाकी आहे,' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं होतं. त्यानंतर पवित्रा आणि दर्शन गेल्या 10 वर्षांपासून एकत्र असल्याचा अंदाज लोकांनी व्यक्त केला होता.
पवित्रानं 2017 साली ट्विटर आणि फेसबुकवर दर्शनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतरही मोठा वाद झाला होता. दर्शनच्या फॅन्सनी त्या फोटोवर आक्षेप घेतल्यानं पवित्रानं तो फोटो डिलिट केला. पवित्रा गौडानं चत्रीगलू, बाथस यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.