KDMC News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अभिलेखा विभागातून फाईल्स गहाळ होण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. युसूफ हाईट्स या बेकायदा इमारतीची फाईल गायब झाल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एका इमारतीची फाईल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नवीन प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली असून प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेकडील मरीयम टॉवर नावाच्या इमारतीची महत्त्वाची कागदपत्रे महापालिकेच्या दप्तरातून गायब झाली आहेत. या इमारतीचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी महापालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेत जमीन मालक मोहंमद फरीद आणि कुलमुखत्यारधारक अफजल बेग यांनी वास्तुविशारदाच्या मदतीने इमारत बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता.
( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी देत 6 मजली इमारत बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र, बिल्डरने या परवानगीचा गैरफायदा घेत 6 मजल्यांऐवजी चक्क 8 मजल्यांचे बांधकाम केले. हे वाढीव 2 मजले पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. या बेकायदा बांधकामाबाबत निसार शेख यांनी माहिती अधिकारांतर्गत महापालिकेकडे माहिती मागितली होती.
पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा संशय
महापालिका प्रशासनाने माहिती देण्यासाठी मरीयम टॉवरची फाईल शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा ती अभिलेखा विभागात नसल्याचे लक्षात आले. या फाईलमध्ये जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे, ना हरकत दाखला, बांधकाम परवानगी आणि इमारतीचे नकाशे असे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज होते.
( नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )
ही फाईल पुराव्यांवर पाणी फिरवण्यासाठी किंवा बेकायदा बांधकाम लपवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राबाहेर नेली असावी किंवा नष्ट केली असावी, असा संशय पोलीस तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. एकामागून एक फाईल्स गायब होत असल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.