संदीप पोवार हा तरुण कोल्हापूरचा रहिवाशी आहे. तो शिरोली एमआयडीसीत कामाला आहे. कामाला जाण्यासाठी तो दुचाकी वापरतो. ती दुचाकी तो कधी कधी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात पार्कींगला लावतो. एक दिवस त्याने त्याची दुचाकी पार्कींगमध्ये लावली होती. कामावरून परत आल्यानंतर मात्र त्याला त्याची दुचाकी पार्कींगमध्ये मिळाली नाही. शेवटी त्याने शाहूपुरी पोलिसात त्याची तक्रार दाखल केली. एक महिना झाला तरी त्याच्या दुचाकीचा काही पत्ता लागला नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कामावर जायचे तर दुचाकी ही गरजेची होती. ती नसेल तर त्याला कामावर जाताच येणार नव्हते. नवीन दुचाकी घेण्यासाठी पैसे नव्हेत. त्यामुळे त्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. मग करायचे काय असा प्रश्न त्याला पडला होता. शेवटी त्याने एक निर्णय घेतला. तो म्हणजे चोरीचा बदला चोरी. त्याने दसरा चौकात शहाजी कॉलेज समोर लावलेली दुचाकी चोरण्याचा निर्णय घेतला. एका बनावट चावीने त्याने ही दुचाकी चोरली. त्यानंतर त्याची नंबर प्लेट बदलली. त्याला आपल्या गाडीची नंबर प्लेट त्याने लावली. त्यानंतर तो याच गाडीचा सर्रास वापर करत होता. कुणालाही त्याच संशय आला नाही.
सर्वकाही ठिक चाललं होतं. तो गाडीवरून ये जा करत होता. आपली गाडी म्हणूनच तो ती गाडी वापरत होता. चोरी त्याला पचली होती. पण त्याच वेळी संदीप पोवारची गाडी कर्नाटकातल्या विजापूर इथं सापडली. तिथल्या पोलिसांनी त्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. शाहुपूरी पोलिसांनीही संदीपची गाडी त्याला परत केली. आता त्याच्याकडे एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या होत्या. त्या वापरायच्या कशा असा प्रश्न त्याच्या समोर होता. अशा वेळी त्याने चोरलेल्या गाडीची नंबर प्लेट काढली. विना नंबर प्लेट तो गाडी घेवून जात असताना त्याला पोलिसांनी हटकले. आणि तिथेच त्याचे बिंग फुटले.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर ई चलान द्वारे गाडीची तपासणी केली. त्यानंतर ती गाडी चोरीची असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने आपल्या बरोबर झालेल्या घटनेचा पाढा पोलिसां समोर वाचला. शिवाय चोरीचा बदला चोरीनेच घेतल्याचे संदीपने पोलिसांना सांगितले. त्याची ही कहाणी ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. दरम्यान पुढील कारवाईसाठी त्याचा ताबा लक्ष्मीपुरी पोलिसांकडे देण्यात आला आहे.