'आई, मला जास्त पैशांची गरज नाही, मला फक्त माझ्या नावापुढं भरपूर पदव्या हव्या आहेत,' कोलकातामधील बलात्कार पीडित (Kolkata rape Case) डॉक्टरच्या आईनं त्यांच्या मुलीच्या आठवणीमध्ये लिहिलेल्या पत्रातील या ओळी आहेत. त्यांनी मुलीला उद्देशून अतिशय भावुक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी मुलीबद्दल काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत की त्या वाचून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. पीडित डॉक्टरच्या आईनं मुलीला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत लोकांनी मदत करावी, असं आवाहन केलंय. माझी लढाई ही तुमच्या सर्वांची लढाई आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील या प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. मृत डॉक्टरच्या आईनं शिक्षक दिनाच्या निमित्तानं हे पत्र लिहिलं आहे. त्यांनी मुलीच्या वतीनं तिच्या सर्व शिक्षकांना वंदन केलंय. माझी मुलीचं लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. तुम्ही सर्व या स्वप्नाची प्रेरणा होतात, असं त्यांनी सांगितलं.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीही माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करत होती. ड्युटीच्या दरम्यानच आरोपींनी तिची हत्या केली, असं पीडित डॉक्टरच्या आईनं पत्रात लिहिलं आहे.
पोलिसांवर गंभीर आरोप
पीडत कुटुंबानं काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. आम्हाला मुलीचा मृतदेह जतन करायचा होता, पण पोलिसांनी अंत्यसंस्कारासाठी दबाव टाकला, असा दावा तिच्या पालकांनी केला. ट्रेनी डॉक्टरचे आई-वडिल सरकारी हॉस्पिटच्या बाहेर झालेल्या आंदोलनातही सहभागी झाले. मुलीच्या मृतदेहासमोरच आपल्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैशांची ऑफर केली होती, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
( नक्की वाचा : Kolkata Doctor Murder : पत्नीला मारलं, मुलाला गमवालं... सासूनं वाचला मुख्य आरोपीच्या पापांचा पाढा )
जवळपास 300-400 पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला घेरलं होतं. आम्ही घरी परतलो तेंव्हा जवळपास 300 पोलीस कर्मचारी घराबाहेर उभे होते. त्यांनी आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार कारायला भाग पाडलं, आम्हाला तिचा मृतदेह जतन करुन ठेवायचा होता, असं पीडितेच्या आई-वडिलांनी सांगितलं.
अत्यंस्कार घाई-गडबडीत उरकण्यात आले. त्याचा खर्चही आमच्याकडून घेण्यात आले नाहीत. काही पोलीस अधिकाऱ्यांनी एका कागदावर माझी सही घेण्याचा प्रयत्न केला. पण, मी तो कागद फेकून दिला, असं त्यांनी सांगितलं.