रेल्वेच्या प्रवासात झालेली एक भेट, त्यानंतर झालेलं प्रेम आणि अखेर लग्नापर्यंत पोहोचलेला हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा वाटू शकतो. मात्र, या कथेचा शेवट इतका भयानक असेल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. पती-पत्नीच्या नात्यात जेव्हा तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होते आणि स्वार्थासाठी रक्ताची नाती विसरली जातात, तेव्हा काय घडू शकतं, याचं धक्कादायक उदाहरण एका घटनेतून समोर आलं आहे.
ज्या पत्नीने आपल्या पतीच्या हत्येचा आरोप इतरांवर लावून न्यायाची मागणी केली, तीच पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाईंड निघाली आणि एका ट्विस्टमुळे या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.
काय आहे प्रकरण?
ही थरारक घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील किऊल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन भागात घडली आहे. 24 डिसेंबर 2025 च्या रात्री किऊल रेल्वे मैदानाजवळ विनोद साह नावाच्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी विनोदचा गळा चिरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
(नक्की वाचा : Facebook Live वर मृत्यूचा थरार! बायको फॉलोअर्सशी बोलत होती अन् सर्वांसमोर झाला नवऱ्याचा मृत्यू )
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विनोदला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारासाठी पाटण्याला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पत्नीनेच केला बनाव
सुरुवातीला या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असता, विनोदची पत्नी असलेल्या गुंजा देवी या तृतीयपंथीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने आपल्याच नात्यातील अमर पासवान, शक्ती पासवान आणि रंजन पासवान या तीन व्यक्तींवर हत्येचा आरोप केला.
27 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला. मात्र, गुंजा देवीने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि आजूबाजूच्या लोकांकडून मिळालेली माहिती यामुळे पोलिसांना सुरुवातीपासूनच तिच्यावर संशय येत होता.
हत्येचा धक्कादायक मास्टरप्लॅन
पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला आणि तिथेच या हत्येमागचे धक्कादायक सत्य बाहेर आले. तपासणीत असे समोर आले की, विनोदची हत्या कोणत्याही जुन्या वैमनस्यातून झाली नसून ती एका मोठ्या कटाचा भाग होती.
गुंजा देवी हिचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमात विनोद अडथळा ठरत होता. धक्कादायक बाब म्हणजे, विनोद जिवंत असतानाच गुंजा हिने 12 डिसेंबर रोजी संतोष कुमार नावाच्या तरुणासोबत कोर्ट मॅरेज केले होते. या दुसऱ्या लग्नानंतर विनोदला कायमचे वाटेतून घालवण्यासाठी गुंजा आणि तिचा प्रियकर संतोष यांनी हत्येचा कट रचला.
रेल्वेतील मैत्री आणि दगाफटका
एसपी अजय कुमार यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, मृत विनोद साह हा मूळचा पाटणा शहराचा रहिवासी होता. काही काळापूर्वी त्याची आणि गुंजाची भेट रेल्वे प्रवासात झाली होती.
ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि विनोद हा गुंजासोबत पती म्हणून राहू लागला. मात्र, गुंजाच्या आयुष्यात संतोष आल्यानंतर तिने विनोदचा काटा काढण्याचे ठरवले. 24 डिसेंबरच्या रात्री संतोषने आपल्या 3 साथीदारांच्या मदतीने विनोदवर हल्ला केला आणि धारदार ब्लेडने त्याचा गळा चिरला. या गुन्ह्यात वापरलेली दोन ब्लेड, गुंजा आणि संतोषच्या लग्नाचे कागदपत्रे आणि 4 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसडीपीओ शिवम कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई करत मुख्य सूत्रधार गुंजा देवी, तिचा प्रियकर संतोष कुमार आणि त्यांचे इतर साथीदार राज नारायण, अजित कुमार आणि मोहम्मद अफताब या सर्वांना अटक केली आहे. प्रेम, फसवणूक आणि सुपारी देऊन केलेली हत्या अशा या विचित्र वळणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पतीच्या मृत्यूचा बनाव रचून सहानुभूती मिळवू पाहणारी गुंजा आता तुरुंगाच्या कोठडीत पोहोचली आहे.