आकाश सावंत
महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती उजेडात आली आहे. महादेव मुंडेंच्या शरीरावर तब्बल 16 वार करण्यात आले होते. त्यांच्या उजव्या मानेवर 4 वार करण्यात आले होते. तोंड ते कानापर्यंत 1 खोल वार होता. गळ्यावर 20 सेंमी लांब, 8 सेंमी रुंद आणि 3 सेंमी खोल वार केला. असे संपूर्ण शरीरावर तब्बल 16 वार होते. मारहाणीमुळे त्यांच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. श्वसननलिका कापली, रक्तवाहिन्या तुटल्या. मानेवर वार करताना घाव चुकला, त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत वार गेला. डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्याजवळ, तळहातावर, मधल्या बोटाजवळ वार होते. खाली पडल्यानंतर त्यांचा डावा गुडघा खरचटलेला होता.
हा अहवाल इतका वेदनादायी आहे की वाचतानाच डोळ्यात पाणी येतं. महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टेमचे फोटोही तीतकेच धक्कादायक आहेत. ही हत्या इतक्या क्रूरपणे केली की ते फोटोही तुम्हाला दाखवू शकत नाही. शिवाय पोस्टामार्टेम रिपोर्टमध्ये फक्त 16 वार नमूद करण्यात आले आहेत. मात्र त्यांच्यावर एकूण 21 वार करण्यात आले असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितलं आहे. हा वाल्मिक कराडचा जुन सहकारी आहे. विशेष म्हणजे हत्येला 18 महिने उलटल्यानंतर आज महादेव मुंडेंचा पोस्टमार्टेम अहवाल समोर येतोय. मात्र अजुनही आरोपी मोकाट आहेत. महादेव मुंडेंचे मारेकरी कोण? हे अख्ख्या परळी जिल्ह्याला माहित आहे. पण आरोपींना पोलीसांचं संरक्षण मिळाल्यामुळे आरोपी मोकाट आहेत. एवढच नाही तर नवनीत कॉवत यांना तपासादरम्यान चुकीची माहिती पुरवली जात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केलाय. कराडला मदत करणारे अजुनही पोलीस यंत्रणेत कार्यरत आहेत. तत्कालीन पोलीस अधिकारी हत्येत सहभागी होते असा आरोपही बांगर याने केला आहे.
या हत्या प्रकरणात संशयित आरोपी कोण कोण आहेत ते एकदा पाहूयात. या हत्या प्रकरणात गोट्या गित्ते, राजा फड, भावड्या कराड, आणि श्री कराड यांच्या नावाचा समावेश आहे. यापैकी गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राईट हँड मानला जातो. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर गोट्या गित्ते पोलिसांच्या गाडीसोबत होता. कराडचे सर्वे अवैध धंदे गोट्या गित्तेच सांभाळत असल्याचं म्हटलं जातं. दुसरा संशयित आरोपी राजा फड आहे. हा राजा फड तोच आहे, ज्याने मतदान केंद्रावर एकाला मारहाण केली होती. याशिवाय राजा फडनेच हवेत गोळीबार करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. राजा फड हा वाल्मिक कराडच्या विश्वासू लोकांपैकी एक मानला जातो.
तिसरा आरोपी भावड्या कराड आहे. हा देखील वाल्मिक कराडच्या विश्वासूंपैकी एक आहे. भावड्या कराडची पत्नी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. तर भावड्या वाल्मिक कराडसोबत त्याची काम पाहायचा. चौथा आरोपी श्री कराड आहे. श्री कराड हा वाल्मिक कराडचाच मुलगा आहे. कराडच्या काळ्या धंद्यांमध्ये त्याची मुलंही सक्रीय आहेत. या हत्येत वाल्मिक कराडच्या मुलाचाही समावेश असल्यामुळेच तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबलं असा आरोप होत आहे. अवघ्या 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंची अमानुष हत्या करण्यात आली होती. मात्र बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती झाल्यानंतरही महादेव मुंडेंचे मारेकरी मोकाट आहेत.एक पत्नी पतीला न्याय मिळावा म्हणून 18 महिन्यांपासून सरकारला विनंती करतेय. पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवतेय. हताश होऊन विष प्राशन करतेय. पण झोपेचं सोंग घेतलेली व्यवस्था जागी होईल असं दिसत नाही. आता आरोपींना पाठीशी घालणार नाही असं आश्वासन देणारे मुख्यमंत्री काही ठोस पावलं उचलणार का? याचीच प्रतीक्षा परळीकर पाहतायत.