मणिपूरात महिलांची नग्न धिंड अन् सीबीआयचे धक्कादायक खुलासे

देशाला हादरवून सोडणाऱ्या मणिपूर हिंसाचार आणि महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंड प्रकरणात सीबीआयने आपल्या आरोपपत्रात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
इंफाल:

देशाला हादरवून सोडणाऱ्या मणिपूर हिंसाचार आणि महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंड प्रकरणात सीबीआयने आपल्या आरोपपत्रात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारा दरम्यान दोन महिलांची नग्न करून धिंड काढण्यात आली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या संपुर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. याचे आरोपपत्र आता सीबीआयने कोर्टात दाखल केले आहे. या संपुर्ण प्रकरणात सीबीआयने मणिपूर पोलिसांकडे बोट दाखवत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 
  
महिलांनी पोलिसांकडे मदत मागितली पण... 

कांगपोकपी जिल्ह्यातील महिलांच्या घरात हिंसक जमाव घुसला होता. त्यांच्या पासून वाचण्यासाठी या महिला जंगलात पळाल्या. मात्र जंगलात जाताना त्यांना जमावाने पाहीलं. काही लोकांनी त्यांना रस्त्या शेजारी पोलिस आहेत त्यांच्याकडे मदत मागा असे सांगितले. त्या महिलांच्या मागे जवळपास एक हजार जणांचा जमाव लागला होता. त्यावेळी त्या महिलांनी तिथे असलेल्या पोलिसांकडे मदत मागितली होती. त्या पोलिसांच्या व्हॅनमध्येही बसल्या होत्या. मात्र गाडीची चावी नसल्याचे सांगत पोलिसांनी मदत करण्यास नकार दिला. शिवाय त्या महिलांना त्या जमावाच्या एकप्रकारे हवाली केले असे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर त्या दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. शिवाय लैंगिक शोषण ही करण्यात आलं असे ही नमूद करण्यात आले आहे. शिवाय या दोन महिलांच्याच कुटुंबातील आणखी एक महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. पण तीच्या नशिबाने ती वाचली आणि जमावापासून पळून जाण्यास जशस्वी झाली. 

Advertisement

हेही वाचा - Explainer: अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्ये अडकले माजी पंतप्रधानांचे नातू, तक्रार दाखल होताच का सोडला देश?

पीडित महिलांपैकी एक माजी सैनिकाची पत्नी 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलांमध्ये एक महिला ही कारगिल यु्द्धात लेढलेल्या सैनिकाची पत्नी होती. सैनिकाच्या पत्नीने पोलिसांकडे आपल्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे अशी विनंती केली होती. मात्र तिलाही पोलिसांनी मदत करण्यास नकार दिला. गाडीची चावी आपल्याकडे नाही असे तिला सांगण्यात आले. या महिलेचा पती आसाम रेजिमेंटमध्ये होता. या महिले बरोबर आणखी एक व्यक्ती या पोलिस व्हॅनमध्ये सुरक्षा मिळावी म्हणून बसला होता. पण त्यालाही पोलिसांनी मदत केली नाही.  

Advertisement

1000 लोकांच्या जमावाने महिलांना घेरले 

सीबीआयच्या आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले की मणिपूरच्या त्या गावात 900 ते 1000 हजार जणांचा हिंसक जमाव होता. त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न त्या तीन महिला करत होत्या. त्यांच्या मदतीला कोणी नव्हते. त्या जमावाच्या मध्ये अक्षरश: फसल्या होत्या. 

Advertisement

जमावाकडे होती हत्यारे    

सीबीआयने असेही स्पष्ट केले आहे की जमावात असलेल्या लोकांकडे हत्यारं होती. त्यात काही लोकांकडे एके रायफल्स, एसएलआर, या सारखी हत्यारं होती. जमावाने कांगपोकपी जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा तोडफोड केली. त्यानंतर त्या घरांना आगी लावण्यात आल्या. 

पोलिस चालकाने गाडी जमावा समोर थांबवली 

पोलिसांकडे संरक्षण मागण्यासाठी आलेल्या महिला आणि पुरूष पोलिसांच्या गाडीत बसल्या. मात्र या पोलिस व्हॅनच्या ड्रायव्हरने त्यांना संरक्षण देण्या ऐवजी ती व्हॅन हिंसक जमावाच्या समोर नेऊन थांबली. नंतर तो आणि त्याचे सहकारी तिथून निघून गेले असेही सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर या हिंसक जमावाने गाडीत बसलेल्या महिलांना खाली उतरवले. त्यांना नग्न करण्यात आले. त्यानंतर त्याच अवस्थेत त्यांची धिंड काढण्यात आली. त्यांचे लैंगिक शोषणही करण्यात आले. 

चार्जशीटमध्ये कोणाची नावं 

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात हुइरेम हेरोदास मैतेई आणि 5 जणांचा समावेश आहे.यात एक अल्पवयी तरूणाचाही समावेश आहे. मणिपूर पुलिसांनी हेरोदास ला जुलै महिन्यातच अटक केली होती. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार, हत्या, या सारखे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.