ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आपल्याला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. शिवाय या मागे महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी एनडीटीव्ही मराठी बरोबर बोलताना केला आहे. जाधव यांच्या आरोपामुळे हा बडा नेता कोण याची चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अविनाश जाधव यांचे मारहाणीचे सीसीटीव्ही समोर
अविनाश जाधव यांच्यावर पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात जाधव हे संबधित सराफाला मारताना दिसत आहे. जाधव यांनीही आपण मारहाण केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या सराफाने एका मुलीला आतमध्ये डांबले होते. तीला किडनॅप केले होते. तीला सोडावे यासाठी आपला आग्रह होता. पण त्याने आपल्यालाच आपण कोण अशी विचारणा करत वेडेवाकडे शब्द वापरले. त्यामुलीला सोडवण्यासाठी त्यावर हात उचलणे गरजेचे होते असेही त्यांनी सांगितले. मात्र आपण पाच कोटीची खंडणी मागितली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
'आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न'
खंडणीची खोटी केस टाकून आपल्याला लटकवण्याचा प्रयत्न होत आहे. या मागे महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी आपण जाणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय दोन पोलिस अधिकारी आपल्याला कसे अडकवले जाणार याचे संभाषणही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जामीन मिळू नये यासाठी पोलिस प्रयत्न करत असल्याचेही जाधव यांनी सांगितले. दोन करोडपती सोने व्यापाऱ्यांच्या भानगडीत आपल्याला गोवले जात आहे असा आरोपही त्यांचा आहे.
अविनाश जाधव
प्रकरण नक्की काय?
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर यांना झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं. मात्र यावेळी वैभव आणि त्यांच्या पत्नीला डांबून ठेवण्यात आले. याची माहिती वैभव यांनी अविनाश जाधव यांना दिली. जाधव त्यांना वाचवण्यासाठी गेले. त्या आधी त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्याचा त्यांचा दावा आहे. घटनास्थळी जाधव पोहोचले. त्यावेळी गेट बंद होते. पुढे ते लॉक तोडून आत गेले. आतमध्ये एक महिला होती. ती वाचवण्यासाठी बोलत होती. त्यावेळी जाधव यांनी सराफाला मारहाण केली. हे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यानंतर त्या महिलेलाही बाहेर काढण्यात आले असे जाधव यांचे म्हणणे आहे. या सर्व घटनेनंतर जाधव यांच्या विरोधात सराफाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या सराफा विरोधातही गुन्हा दाखल केला असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. दरम्यान वाचवण्यासाठी गेलो तर आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र ज्याने किडनॅप केले त्याला सोडून देण्यात आले असेही ते म्हणाले.