मुंबई: पनवेलमधील डॉक्टर दांपत्यावर धावत्या ट्रेनमध्ये चोरट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड एक्सप्रेस ट्रेनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. यामध्ये डॉक्टर दिपाली देशमुख आणि पती योगेश देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पनवेल येथे राहणारे डॉक्टर दांपत्य दीपाली योगेश देशमुख (वय, 44) आणि योगेश शामराव देशमुख (वय,50) हे मुलासह आपल्या नातेवाईकाकडे जात होते. 4 जूनच्या पहाटे त्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नांदेड एक्सप्रेस ही गाडी पकडून कोच एस4 च्या सीट क्रमांक2,3 आणि 5 वर प्रवास करत होते.
याचवेळी त्यांच्यावर एका दरोडेखोराने हल्ला केला. ट्रेनचा वेग कमी होत असताना एका अज्ञात व्यक्तीने डब्यात चढून महिला डॉक्टर दीपाली योगेश देशमुखयांची पर्स हिसकावून उडी मारली. त्यांची पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात दीपाली चालत्या ट्रेनमधून पडल्या. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टर योगेश शामराव देशमुख यांनीही ट्रेनमधून उडी मारली, परंतु या दरम्यान आरोपींशी त्यांची झटापट झाली आणि त्यांचा तोल गेला आणि ते ट्रेनखाली पडले. अपघातात त्यांचा हात तुटला.
( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!)
दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी डब्यात कोणताही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता किंवा स्टेशन परिसरात गस्त घालणारे आरपीएफ-जीआरपी जवान किंवा ट्रॅक दिसत नव्हते. दरम्यान, कुर्ला रेल्वे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ (४) आणि (५) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.