एका 36 वर्षीय विवाहीतेवर सासरचे लोक घरामध्येच अंत्यसंस्कार करत होते. सरण रचलं गेलं होतं. सर्व तयारी झाली होती. मृतदेहाला अग्नी ही दिला गेला. पण त्याच वेळी तिथे हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. फिल्मी स्टाईल पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सरणावर ठेवलेला मृतदेह आगीतून बाहेर काढला आणि उलगडा झाला मोठ्या एका षडयंत्राचा. ही घटना घडली राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील डीग तालुक्यामध्ये. एका विवाहितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना पोलिसांनी तो चितेवरून ताब्यात घेतला.
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गाव हादरून गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ककडा गावातील 36 वर्षीय सरला नावाच्या विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. तिच्या पतीने आणि कुटुंबीयांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली. खोह पोलीस ठाण्याचे अधिकारी महेंद्र शर्मा यांनी कुटुंबीयांना अंत्यसंस्कार थांबवण्याचे निर्देश दिले होते. पण त्यांनी पोलिसांच्या येण्यापूर्वीच अंत्यसंस्कार सुरू केले.
पण त्याच वेळी पोलिस तिथे पोहोचले. त्यावेळी सरणावर महिलेचा मृतदेह होता. विधी झाले होते. मुखाग्नी दिला गेला होता. हे पाहाताच पोलीसांनी तातडीने चितेवरचा मृतदेह बाहेर ओढला. अर्धवट जळलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यावेळी सर्वच जण आवाक झाले. मृतक सरलाचा भाऊ विक्रांतने तिचा पती अशोक आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे म्हणणे आहे की, 2005 साली सरलाचा विवाह अशोक बरोबर झाला होता. तेव्हा पासून सरलाला मूलबाळ नव्हते. त्यामुळे अशोक आणि त्याचे कुटुंबीय तिला सतत त्रास देत होते. यापूर्वीही अनेकदा त्यांनी सरलाला मारहाण केली होती असं त्याने पोलीसांना सांगितलं.
आता पोलिसांनी मृतदेह डीग रुग्णालयाच्या शवागारात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणात नेमकी हत्या कोणत्या कारणांमुळे झाली, याचा तपास सुरू आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोस्टमॉर्टमनंतर सरलाचा खून झाला होता की नाही हे स्पष्ट होणार आहे. हा खून आहे की नैसर्गिक मृत्यू याचे ही गुढ यातून उकलण्यास मदत होणार आहे.