Odisha News Student Eyes Sealed With Glue: ओडिशातील (Odisha) कंधमाल (Kandhamal) जिल्ह्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. हॉस्टेलमधील (Hostel) काही विद्यार्थ्यांनी रात्रभर झोपलेल्या आपल्या 8 वर्गमित्रांच्या डोळ्यात ‘इन्स्टंट गोंद' (Instant Glue) टाकल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. गोंदामुळे या मुलांच्या पापण्या (Eyelids) एकमेकांना चिकटल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना कंधमालमधील सालागुडा (Salaguda) येथील सेवाश्रम शाळेत घडली. तिसरी, चौथी आणि पाचवीमध्ये शिकणारे हे 8 विद्यार्थी रात्री हॉस्टेलमध्ये झोपले होते, तेव्हा त्यांच्या काही वर्गमित्रांनी गंमत म्हणून त्यांच्या डोळ्यात गोंद टाकला. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली, तेव्हा डोळ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्यांच्या पापण्या चिकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हॉस्टेल प्रशासनाने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना विशेष उपचारांसाठी फुलबनी (Phulbani) येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
मुलांवर उपचार सुरू, मुख्याध्यापक निलंबित
डॉक्टरांनी सांगितले की, चिकट पदार्थामुळे डोळ्यांना मोठी इजा (Eye Damage) झाली आहे, परंतु वेळेवर उपचार मिळाल्याने विद्यार्थ्यांची दृष्टी (Vision) वाचवता येईल. सध्या एका विद्यार्थ्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, इतर सात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
या गंभीर घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाने शाळेचे मुख्याध्यापक मनोरंजन साहू (Manoranjan Sahu) यांना निष्काळजीपणा (Negligence) केल्याबद्दल निलंबित केले आहे. अशा प्रकारची घटना कशी घडली, याची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. जिल्हा बाल कल्याण अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.