मनोज सातवी, पालघर:
Palghar Crime: राज्यात अन्न व औषध प्रशासनाने गुटखा, तंबाखुसारख्या अंमली पदार्थांवर धडक कारवाईची मोहिम सुरु केली आहे. तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईने अंमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले असून पान टपऱ्यांवरुन हे पदार्थ गायब झालेत. अशातच पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये गुटखा तस्करांनी गाडीवर भारत सरकार अन् भाजपचे चिन्ह लावून अवैध धंदे सुरु केल्याचं समोर आले आहे.
'भारत सरकार'ची पाटी आणि भाजपचं कमळ...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुटखा विक्री आणि तस्करीविरोधात तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलेला असतानाच, पालघरमध्ये गुटखा तस्करांची धक्कादायक शक्कल समोर आली आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा आणण्यासाठी तस्करांनी थेट त्यांच्या इनोव्हा कारवर 'भारत सरकार' अशी पाटी लावली होती, तर समोरील आणि मागच्या काचेवर भाजपचे कमळ चिन्ह आणि पुढे भाजपचा झेंडा लावून वाहनाला अधिकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता.
कारमध्ये 20.60 लाखांचा गुटखा!
गुप्त माहितीच्या आधारे तलासरी पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईकडे येणारी संशयित इनोव्हा कार अडवून झडती घेतली. यावेळी कारमधून तब्बल 20 लाख 60 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. पोलीसांनी वाहनासह गुटखा ताब्यात घेतला असून, या प्रकरणातील तस्करीचे जाळे उघड करण्यासाठी पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.