पोलिसाचा डोळा लागला, कैद्याने उशी खालून चावी घेतली अन्...

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिस रात्री झोपी गेला होता. हे आरोपीने पाहीले. त्यानंतर हळूच पोलिसाने उशाला ठेवलेली चावी त्याने काढली. त्यानंतर बेड्या खोलल्या आणि तिथून धुम ठोकली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सुंबा येथील रहिवासी आरोपी विलास नारायण तायडे याला उपचारासाठी रूग्णालयात आणले होते. त्याच्या विरोधात हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 

हेही वाचा - महायुतीचे टेन्शन वाढले, शांतिगीरी महाराजांचा मोठा निर्णय

गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. यावेळी एक कर्मचारी त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी वार्डात होता. पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपेत असल्याचा फायदा आरोपीने घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या उशी खाली ठेवलेली चावी त्याने काढली. नंतर हातातली बेडी सोडली. त्याच क्षणाला तो तिथून फरार झाला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याने पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement