Sunjay Kapur Property Case: दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबियातील अंतर्गत कलह आता कायदेशीर लढाईच्या एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. या प्रकरणात संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांनी नणंद मंधिरा कपूर स्मिथ यांच्याविरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेत फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया, विविध पॉडकास्ट आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून मंधिरा यांनी आपली जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा खळबळजनक आरोप प्रिया कपूर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
काय आहे प्रकरण?
कपूर कुटुंबियातील मालमत्ता आणि वारसाहक्काचा वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. मात्र, आता हा वाद केवळ संपत्तीपुरता मर्यादित न राहता वैयक्तिक चिखलफेकीपर्यंत पोहोचला आहे.
मंधिरा कपूर स्मिथ यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्याविरुद्ध सातत्याने खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याचे प्रिया कपूर यांनी म्हटले आहे. यामुळे समाजात आपली असलेली प्रतिमा मलिण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Sunjay Kapur Property : 'त्या' रात्री प्रिया कपूर कुठे होत्या? कॉल रेकॉर्ड्समुळे 3000 कोटींच्या लढाईत ट्विस्ट )
पटियाला हाऊस कोर्टातील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर ही तक्रार सादर करण्यात आली. प्रिया कपूर यांच्या कायदेशीर टीमने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, संजय कपूर यांच्या मालमत्तेशी संबंधित अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. असे असूनही, मंधिरा कपूर यांनी जाहीरपणे या विषयांवर भाष्य करून आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून कायदेशीर मर्यादेचे उल्लंघन केले आहे. हे आरोप निराधार असून केवळ मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने केले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
कोर्टात काय झाले?
दिल्लीतील न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. प्रिया कपूर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग आणि वकील स्मृती अस्मिता यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ज्या पद्धतीने मुलाखती आणि पॉडकास्टचा वापर बदनामीसाठी केला गेला, ते अत्यंत गंभीर आहे. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत तिची रितसर नोंदणी केली असून, यामुळे मंधिरा कपूर स्मिथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हाय-प्रोफाइल कुटुंबामधील हा वाद आता फौजदारी स्वरूपाचा झाल्यामुळे दिल्लीच्या कायदेशीर वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मालमत्तेच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता मानहानीच्या दाव्यापर्यंत पोहोचल्याने कपूर कुटुंबियातील दरी अधिकच रुंदावली असल्याचे दिसून येत आहे.