स्वानंद पाटील, बीड: गेल्या दोन महिन्यांपासून बीडमधील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असून याप्रकरणात आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर आले आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी गाडी सोडून पळाल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडमधील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झालेत. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या अत्यंत निर्घृण आणि क्रुर हत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. एकीकडे या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे फरार असतानाच या प्रकरणाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी वाशीच्या पारा चौकातून फरार झाले होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून पळाले. दैठणा, मांजरा नदी, वाशी तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव, दसमेगाव, येथुन सहाही आरोपी धाराशिवच्या वाशी शहरातील पारा चौकात पोहोचले, पुढे वाशी पोलीस चौकात बंदोबस्त लावुन उभे होते.
दरम्यान, पारा चौकात पोलिसांना पाहुन आरोपी एका गल्लीतुन लेंडी नावाच्या नाल्यातुन पळाले. जो नाला तांदुळवाडी रस्ता पार करून वाशी कारखाना आणि जंगलाकडे जातो. त्यानंतर 4 की.मी अंतर पार करून आरोपी महामार्गावरुनच पसार झाले अशी माहिती समोर आली आहे. तब्बल दोन महिन्यांनी समोर आलेल्या या व्हिडिओमुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!