Walmik Karad Wife : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वाल्मिकवर 'मोक्का'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजत आहे. त्याचवेळी वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडनं (Manjali Karad) पतीच्या बाजूनं मैदानात उडी घेतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मी त्यांची प्रकरणं बाहेर काढणार
माझ्या पतीला पोलिसांनी अडकवलं आहे. या प्रकरण एका फोन कॉलवरुन 302 अंतर्गत गुन्हा कसा दाखल झाला? हे कोर्टानं सुनावणीच्या दरम्यान विचारले. माझ्या पतीला अडकवण्यात आले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझा माणूस बाहेर येणार, असा दावा मंजली यांनी केला.
माझ्या नवऱ्यावर ज्यांनी आरोप केले, त्यांची प्रकरणं बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 'सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांचे कारनामे मी बाहेर काढणार आहे. त्याबाबतचे पुरावे शोधणे सुरु आहे,' असं त्यांनी सांगितलं.
माझ्या पतीला पोलिसांनी अडकवलं असल्याचा वाल्मिक कराडच्या पत्नीने आरोप केला आहे. माझ्या नवऱ्यावर ज्यांनी आरोप केले आहेत त्यांची प्रकरणं मी बाहेर काढणार असा इशाराही मंजली कराड यांनी दिला आहे. शिवाय जरांगेंकडे मी न्याय मागते. मी ही मराठा आहे असं ही त्या यावेळी म्हणाल्या.
( नक्की वाचा : Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला कसा लागला मोक्का? कोर्टातल्या युक्तिवादाची Inside Story )
मनोज जरांगेंकडं मागणी
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, तसाच न्याय एक महिला म्हणून मलाही जरांगे यांनी मिळवून द्या. एक महिला म्हणून, मराठा म्हणून मी जरांगे यांच्याकडे न्याय मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार? तुम्ही फक्त एकटेच मराठा समाजाचे आहात का? मी देखील मराठा आहे, असं त्यांनी सांगितलं.
मराठा-वंजारी वाद पेटवला जात आहे. राजकीय लोकांचं म्हणणे ऐकू नका, असं मंजली यांनी सांगितलं. या प्रकरणात आपण धनंजय मुंडे यांची भेट घेतली नाही, याबाबत खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
फ्लॅट घेणे बेकायदेशीर नाही
पिंपरी चिंचवडमधील मंजली कराड यांच्या फ्लॅटला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर त्या फ्लॅटमध्ये आम्ही कुणीही राहत नाही. फ्लॅट घेणे बेकायदेशीर नाही. सर्वांकडे फ्लॅट आहेत. आम्ही लोनवर फ्लॅट घेतला आहे. सर्व पुरावे काढून पाहा असं आव्हानही त्यांनी यावेळी दिलं.