अनैतिक संबधातून एक भयंकर घटना साताऱ्यात घडली. शिवथर या गावात 7 जुलैला दुपारी एका विवाहीत तरुणीचा खून करण्यात आला होता. मात्र तो कुणी केला याचं कोडं पोलिसांना सोडवायचं होतं. विशेष म्हणजे हा खून झाला त्यावेळी ही तरुणी घरी एकटीच होती. तिचा पती साताऱ्यात कामाला गेला होता. तर सासू सासरे हे शेतात कामाला गेले होते. तिचा लहान मुलगा ही घरी नव्हता. अशा वेळी डाव साधत तिचा खून करण्यात आला. या घटनेनं शिवथर या गावात एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.
पूजा जाधव या तरुणीचे 2017 मध्ये प्रथमेश जाधव या तरुणाबरोब लग्न झाले होते. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रेमविवाह होता. लग्नानंतर पूजाला एक मुलगा ही झाला. याच काळात तिचे गावातल्याच अक्षय साबळे या तरुणा बरोबर सुत जुळले. दोघांचे ही प्रेमसंबंध सुरू होते. पती कामावर जात होता. तर सासू सासरे हे शेतात जात होते. पूजा ही घरी त्या वेळी एकटीत असायची. त्याच वेळी या दोघांचे प्रेमही बहरत गेले. शिवाय पूजाचे घर गावापासून लांब होते. त्यांच्या अजूनबाजूला एकही घर नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे फावत होते.
अक्षयला काही करून पूजा बरोबर लग्न करायचे होते. तो तिला तिच्या मुलासह स्विकारायला तयार होता. पण पूजाचा लग्नासाठी नकार होता. ती लग्न करण्यास टाळाटाळ करत होती. मात्र त्याने तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. सोमवारी दुपारी घरी कोणी नसताना अक्षय तिला भेटायला गेला होता. त्यावेळी लग्नावरून दोघांमध्ये भांडण झालं. आपण पळून जावून लग्न करू असे अक्षय तिला सांगत होता. पण ती त्याचं काही ऐकण्याच्या स्थिती नव्हती. तिने पळून जावून लग्न करण्यास नकार दिला.
त्याचा अक्षयला प्रचंड राग आला. त्यांने त्या रागाच्या भरात पूजाचा चाकून गळा चिरला. ती जागीच कोसळली. तिचा त्यात मृत्यू झाला. पूजाचा खून करून अक्षयने तिथून पळ काढला. घटनेनंतर पोलिस पोहोचले. त्यांनी चौकशी केली. गावात अक्षय आणि पूजाच्या प्रेमाची चर्चा आधी पासूनच होती. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षयचा फोन ट्रेस केला. त्यावेळी तो पुण्यात असल्याचे समजले. अवघ्या 12 तासात पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्यांनी झालेली सर्व घटना पोलिसांना सांगितली.