Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र

Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महिला डॉक्टरचं संपूर्ण पत्र 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.

जाहिरात
Read Time: 8 mins
Satara Doctor Death : फलटणच्या महिला डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं संपूर्ण पत्र वाचा
सातारा:

राहुल तपासे, प्रतिनिधी

Satara Doctor Death : सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या डॉक्टरने गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर) हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या या महिला डॉक्टरनं चौकशी समितीला केलेला खुलासा NDTV मराठीला मिळाला आहे.

हे खुलासा पत्र 4 पानांचे आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, केवळ पोलीस अधिकारीच नव्हे, तर एका माननीय खासदाराचा (MP) आणि त्यांच्या स्वीय सचिवाचा (PA) या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णांना 'फिटनेस सर्टिफिकेट' (Fit Certificate) देण्यावरून आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप मृत डॉक्टरांनी या पत्रात केला आहे. या पत्रातील उल्लेखामुळे हे प्रकरण आता केवळ शासकीय पातळीवर न राहता, थेट राजकीय वर्तुळाशीही कनेक्शन असल्याचं सिद्ध झालं आहे.

राजकीय दबाव आणि 'फिटनेस' प्रमाणपत्र वाद

महिला डॉक्टरच्या या खुलाश्यानंतर वैद्यकीय आणि पोलीस प्रशासनातील संघर्षाची दाहकता समोर आली आहे. पोलीस अधिकारी काही संशयित आरोपींना 'फिट' असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकत होते, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Satara Doctor Case: फलटण डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख )
 

मानसिक त्रास आणि तक्रारींची दखल नाही

या पत्रातून मृत डॉक्टरांनी आपला झालेला मानसिक छळ आणि प्रशासकीय यंत्रणेकडून झालेली उदासीनता यावर प्रकाश टाकला आहे. पोलिसांच्या वारंवारच्या 'उद्धट बोलण्यामुळे' कामास व्यत्यय येत होता आणि अपमानजनक शब्दांचा प्रयोग केला जात होता, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.  विशेषतः, 'बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत', 'बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत' अशा प्रकारे जातीयतेवर आधारित हिणवण्याचे गंभीर आरोपही डॉक्टरांनी केले आहेत. 

Advertisement


वाचा महिला डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं संपूर्ण पत्र

मी डॉक्टर XXX चौकशी समिती समोर लिहून देते की माझ्यावर झालेल्या तक्रारीचा खुलासा देते.

दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी १२ वाजता फलटण ग्रामीणचे कर्मचारी आरोपीला घेऊन आले असता त्यांनी मला गुन्ह्याच्या संदर्भातील गांभीर्य सांगितले नाही, त्यामुळे मी त्यांना सकाळी येण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी डॉक्टर धुमाळ सर यांना फोन केला. त्यानंतर डॉक्टरांनी मला फोनद्वारे आरोपी बघण्यास सांगितल्यावर मी लगेच पेशंट बघितला, तेव्हा पेशंटचा बीपी 220/110 mhg होता, त्यामुळे मी पेशंटला ॲडमिट करून उपचार करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे सरांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनवरून बोलले व त्यांना जो काही गैरसमज झाला आहे त्यासाठी समोर येऊन चर्चा करा असे बोलले असता, त्यांनी येण्यास नकार दिला, मी बाहेर आहे असे सांगितले. त्यावेळी जायपत्रे सर हे हॉस्पिटलच्या आवारातच गाडीमधून बोलत होते. संबंधित टाईममध्ये हॉस्पिटलचा कॅमेरा चेक करण्यात यावा.

Advertisement


पोलीस निरीक्षक अनिल महाडिक सरांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचवेळी पोलीस हवालदार एनडी चतुरे यांनी देखील आरोपी फिटनेससाठी आणला होता. डॉक्टर धुमाळ सर यांच्या म्हणण्यानुसार दोन्हीही आरोपी चेक करून बीपी वाढल्याकारणाने ॲडमिट करून घेतले व फिजिशियन फिटनेससाठी डॉक्टर केशव सर यांना फोनद्वारे मेसेज करून अभिप्राय मागितला.

त्यांनी तो मेसेज सकाळी बघून मला पेशंटसाठी टू डी इको करण्यास सातारा येथे पाठवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी आरोपी नामे मल्हारी अशोक च.. वय ४२ यांना टू डी इको करण्यासाठी सातारा येथे निघण्याचे पत्र दिले व दुसरा आरोपी नामे स्वप्नील सुरेश जाधव वय २५ यांचा बीपी कमी झाल्यामुळे त्यांना फिटनेस दिला.

Advertisement


त्यानंतर पंधरा मिनिटांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळ सर व डॉक्टर केशव सर यांच्या म्हणण्यावरून मी आरोपी फिट दिला. त्यावेळी डॉक्टर ननावरे मॅडम यांचाही काही सल्ला घेतला व दहा मिनिटांनी माननीय खासदार (MP) यांचे दोन पीए (PA) आले व त्यांनी मला फोन देऊन माननीय खासदार बोलत आहे असे सांगितले.

तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना माननीय खासदार सरांनी मला विचारणा केली की, पोलीस कर्मचारी यांची कंप्लेंट अशी आहे की, तुम्ही बीडचे असल्यामुळे तुम्ही आरोपी यांना फिट देत नाही असे पोलिसांचे आरोप आहेत. तेव्हा त्यांना 'असे आरोप चुकीचे आहेत व येथून पुढे असे आरोप होणार नाहीत' असे मी त्यांना हमी दिली.

त्यानंतर मी पोलीस निरीक्षक महाडिक सर यांना फोनद्वारे पोलिसांनी केलेल्या आरोपांची विचारणा केली असता, त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली व 'माझा त्यामध्ये काही संबंध नाही' असे सांगितले. व मी जे बोलले तेव्हा त्यांनी माझी तक्रार न घेण्याची भूमिका घेतल्यामुळे मी त्यांना 'माझ्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण?' असे विचारणा केली असता, त्यांनी माझा फोन कट केला.

त्यानंतर दोन तासांनी माननीय डीवायएसपी सरांना झालेला प्रकार फोनद्वारे सांगितला व तेव्हा त्यांनी 'मी त्याचा फॉलोअप घेऊन कळवतो' असे सांगितले. परंतु आजतागायत मला त्यांचा काहीही फॉलोअप भेटला नाही, त्यामुळे मी त्यांना दिनांक 19/06/2025 रोजी लेखी मध्ये कंप्लेंट केली. परंतु मला त्यांचा काहीही फॉलोअप भेटला नाही.

माननीय पोलीस निरीक्षक यांनी केलेले आरोप मी deny करत आहे व झालेल्या प्रकाराबद्दल माननीय पोलीस निरीक्षक यांनी मला प्रूफ देऊन खुलासा देण्याची विनंती मी करत आहे.


दिनांक 09/07/2025 रोजी फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी आरोपी नामे चेतन शंकर लांडगे यांना आणले असता त्याचा बीपी वाढल्याकारणाने त्याला ॲडमिट करून त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली व आरोपीला सकाळी नऊ वाजता बीपी कमी झाल्यामुळे त्यास फिट देऊन आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला. रात्री आरोपी बोर्डमध्ये ठेवल्यामुळे ही पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीच्या संरक्षणासाठी ऑफिशियल पोलीस ठेवण्याची विनंती केली, कारण माननीय महाडिक सरांच्या पत्रानुसार सदर आरोपीने गंभीर गुन्हा केला होता. त्यामुळे केलेले आरोप मी पूर्णपणे नाकारत आहे.

माननीय महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे मी इलेक्ट्रिक डीपी चोरीतील ऊसतोड मुकादम यांना फिटनेस दिल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी मला सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती मी चौकशी प्रकरणाला करत आहे. त्यामुळे केलेले आरोप मी पूर्णपणे फेटाळत आहे. आरोपी फिटने दिल्यास त्यांनी माझ्या वरिष्ठांना कळवत दुसऱ्या डॉक्टरांनी पेशंट तपासण्यासाठी विनंती करायला हवी होती, अशी कोणतीही विनंती त्यांनी पत्राद्वारे केलेली नाही. व आरोपी फिट अनफिट करण्याचा सर्वस्वी निर्णय हा ऑन ड्युटी डॉक्टर व त्यांचे वरिष्ठांचा असावा असे माझे मत आहे, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला कामात अडथळा आणून त्रास देऊ नये अशी विनंती मी चौकशी समितीला करत आहे. त्यामुळे केलेले आरोप मी पूर्णपणे नाकारत आहे व अधिकाऱ्यांच्या वारंवार बोलण्यामुळे कामास वेळ लागत आहे व कामास व्यत्यय येत आहे.

दिनांक 16/07/2025 रोजी: आरोपी नामे लक्ष्मी बाळू खरात वय ५६ वर्षे यांना प्रीअरेस्ट साठी पोलीस कर्मचारी श्री अभंग यांनी आणले असता पेशंटचा बीपी 188/110 mhg असल्याकारणाने पेशंटचे डोके दुखत होते, त्यामुळे मी त्यांना ॲडमिट करावे लागेल असे सांगितले.

असे सांगितले असता, पोलीस कर्मचारी अभंग यांनी गुन्ह्याच्या नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक जायपत्री यांना फोनद्वारे कॉल करून बोलावून घेतले व त्यांनी दोघांनी मिळून माझ्याशी वाद घालत आरोपी फिटच द्या अशी धमकी दिली व माझे अभिप्राय नाकारले. त्यावेळी मी त्यांना ॲडमिट करून बीपी कमी झाल्यावर फिट देते असे म्हटले असता त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही व माझ्याशी वाद घातला. झालेला प्रकार मी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक श्रीमती निगडे मॅडम यांना फोनद्वारे सांगितला व त्यांनी मला आरोपी ॲडमिट करून उपचार करण्याचे फोनद्वारे सांगितल्यावर श्री अभंग यांनी त्यास नकार देत आम्हाला अनफिटचे सर्टिफिकेट द्या असा दबाव टाकला व आम्हाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली व त्यांनी उपचारासाठी विरोध केला.

थोड्या वेळाने ते मला म्हणाले की, आरोपी इथेच ठेवून घ्या, आम्ही जातो. त्यावेळी मी त्यांना कोणीतरी ऑफिशियल पोलीस ठेवा अशी विनंती केली, कारण आरोपी माननीय महाडिक सरांच्या पत्रानुसार गंभीर होता. त्यावेळी नकार देत त्यांनी आरोपीचे चेकअप न करता घेऊन गेले व त्यामुळे माननीय महाडिक सरांनी केलेले आरोप मी फेटाळत आहे.

झालेला प्रकार मी माननीय महाडिक साहेबांना सांगण्यासाठी फोन केले असता, त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला. त्यामुळे ऑन ड्युटी स्टाफच्या फोनवरून फोन केले असता, त्यांनी मला "तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही तुमचे बघून घेतो" अशी धमकी माझे बोलणे न ऐकता दिली.

त्यामुळे माननीय महोदय चौकशी समिती यांना विनंती करत आहे की, त्यांनी केलेले आरोप पुराव्यानिशी सादर करावेत व त्यांना झालेल्या प्रकारात केलेले गंभीर आरोप हे पोलीस व डॉक्टर यांच्या सुव्यवस्थेत अडथळा आणत आहेत हे निदर्शनास आणून द्यावे याची मी विनंती चौकशी प्रशासनाला करत आहे.

माननीय महोदय फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी पीएसआय बदने सर हॉस्पिटलमध्ये येऊन इमर्जन्सी ड्युटीवरच्या चेअरवर बसून आम्हाला धमकी देतात ही बाब अतिशय गंभीर आहे, हे त्यांना निदर्शनास आणून द्यावे अशी विनंती मी चौकशी प्रशासनाला करत आहे.व आरोपी फिट अनफिटच्या नोंदी हा सर्वस्वी निर्णय ऑन ड्युटी डॉक्टर व त्यांचे वरिष्ठ यांचा असावा असे त्यांना निदर्शनास आणून द्यावे अशी मी विनंती करत आहे.

माननीय महाडिक सरांच्या पत्राप्रमाणे मी पोलीस उपनिरीक्षक पाटील सर यांच्या अंडर तपासासाठी असलेल्या पीडित मुलीची तपासणी लेखीच केलेली आहे. त्यामुळे माननीय महाडिक सरांनी केलेले आरोप हे मी पूर्णपणे नाकारत आहे व माननीय महाडिक सरांनी पोलीस उपनिरीक्षक पाटील सर ह्यांशी संवाद साधून डॉक्टरांना करण्यास नकार दिला का हे तपासून पहावे अशी विनंती मी चौकशी प्रशासनाला करत आहे.

 माझ्यावर केलेले ग्रामीण पोलीस स्टेशनचे आरोप आहेत, त्यामुळे माननीय चौकशी समिती अधिकारी आपण मी केलेल्या लेखी तक्रारीची विचारणा पोलीस प्रशासनास करावी अशी मी विनंती करत आहे, कारण मी 19/06/2025 ला लेखी तक्रार डीवायएसपी ऑफिसमध्ये केली, त्यामुळे त्यांनी माझ्यावर तक्रार करून दोषी ठरवत आहेत व मी केलेल्या तक्रारीचा मला कोणताही फॉलोअप फोन, मेसेज व ईमेलद्वारे कळवलेला नाही, त्यामुळे माझा त्यांच्याशी काही पर्सनल वाद असलेलाच आरोप मी पूर्णपणे फेटाळत आहे. व झालेल्या प्रकाराचा किंवा झालेल्या तक्रारीचा मी कोणताही वैयक्तिक संदर्भ नाही व माननीय पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या आरोपाचा पुरावा मी माझ्या पत्रासोबत जोडत आहे.

माननीय चौकशी समिती अध्यक्ष यांना विनंती करत आहे की, पोलिसांनी मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये व अधिकाऱ्यांशी अपशब्द जसे की "बघा मॅडम तुमचे दीडशे आरोपी", "बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हे करत आहेत", "बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत" अशा शब्दात हिणवू नये. ही बाब माननीय पोलीस निरीक्षक यांच्या पत्राला अनुसरून खूप गंभीर आहे व पोलीस प्रशासन कायद्याचं उल्लंघन करून डॉक्टरांना नाहक त्रास देत आहेत. अशी बाब गंभीर असून त्यांना समज द्यावी याची विनंती मी करत आहे.

मी फेब्रुवारीपासून पोलीस कर्मचारी यांचा मानसिक त्रास सहन करत आहे. यातून अनुचित काही घडले तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून देत आहे. व त्यांनी केलेल्या मानसिक त्रासाचा इथून पुढे सहन केला जाणार नाही असेही सांगावे अशी मी विनंती चौकशी प्रशासनाला करत आहे. व आरोपी फिट किंवा अनफिट देण्याचा सर्वस्वी निर्णय ऑन ड्युटी डॉक्टर व त्यांचे वरिष्ठ यांचा आहे हे निदर्शनास आणून द्यावे अशी मी विनंती करत आहे.

अध्यक्ष, मी पुढील प्रशासनास पुराव्यानिशी पोलिसांची तक्रार होईल असे मी लिहून देत आहे. माझ्या पत्राच्या सोबत मी पुरावे जोडत आहे.
 

Topics mentioned in this article