Satara Doctor Suicide Case : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बाळासाहेब बदने याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये एका 28 वर्षीय महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या महिला डॉक्टरचा मृतदेह तपासला असता, तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली. या नोटमध्ये तिने स्पष्टपणे सांगितले होते की, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच, प्रशांत बनकर नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर तिला मानसिक त्रास देत होता. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गोपाळ बदने याला अटक केली होती, जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलीस खात्याने का केली मोठी कारवाई?
गोपाळ बदने याच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली होती. या चौकशीमध्ये त्याने केलेले अनेक गैरप्रकार आणि गैरवर्तन समोर आले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनेने पोलीस दलाचा अधिकारी असतानाही बेजबाबदारपणे आणि विकृत पद्धतीने वागून आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याचे हे कृत्य पोलीस दलाच्या नियमांनुसार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय ठरले आहे.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
बडतर्फीचा अंतिम निर्णय
पोलिसांसारख्या महत्त्वाच्या नोकरीत राहून असे घृणास्पद काम करणाऱ्या व्यक्तीला सेवेत ठेवणे हे लोकांच्या हिताचे नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कायद्यातील अधिकार वापरून गोपाळ बदने याला कायमस्वरूपी पोलीस नोकरीतून काढून टाकण्याचा (बडतर्फ करण्याचा) आदेश दिला. या कारवाईमुळे, या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस खात्याशी असलेला संबंध पूर्णपणे संपला आहे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.