Bank Loot Case: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातल्या चडचणमध्ये मंगळवारी संध्याकाळी बँक लुटीची एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत घुसून बुरखाधारी आणि सशस्त्र दरडोखोरांनी सुमारे 21 कोटी किंमतीची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटले. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी सैनिकी गणवेशासारखे कपडे घातले होते आणि त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व धारदार शस्त्रे होती. त्यांनी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास बँकेत प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांवर धाक दाखवत त्यांचे हात-पाय प्लास्टिकच्या पिशव्यांनी बांधले. बँक मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांना शौचालयात कोंडून ठेवण्यात आले, जेणेकरून कोणीही विरोध करू नये. ग्राहकांनाही ओलीस ठेवण्यात आले.
दरडोखोरांनी बँकेत घुसताच, "पैसे बाहेर काढ, नाहीतर जीवे मारू," असे बँक मॅनेजरला धमकावले. नंतर त्यांनी कॅश व्हॉल्ट आणि सोन्याचे लॉकर उघडायला लावले. त्यांनी ग्राहकांनी जमा केलेले दागिने आणि बँकेतील रोकड पिशव्यांमध्ये भरून पोबारा केला.
( नक्की वाचा : Dombivli: एका शिक्षिकेला फसविले; दुसरीसोबत लग्न, तिसरीपासून मुल, डोंबिवलीतील शिक्षकाचे धक्कादायक कृत्य )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी ही घटना घडवण्यासाठी बनावट नंबर प्लेट असलेली व्हॅन वापरली. या घटनेनंतर ते महाराष्ट्रातील पंढरपूरकडे पळून गेले. वाटेत सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या कारचा अपघात झाला, ज्यामुळे त्यांची स्थानिक लोकांशी बाचाबाचीही झाली. तरीही, ते लुटलेले सामान घेऊन पळून गेले.
विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबारगी यांनी सांगितले की, या घटनेनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी संयुक्त पथके तयार केली आहेत. बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वेगाने सुरू आहे.