12 वर्षांच्या मुलीनं तिच्याच आई-वडिलांवर दीड लाख रुपयांमध्ये तिला विकल्याचा आरोप केला आहे. शनिवारी (17 मे) रोजी हे धक्कादायर प्रकरण उघड झालं. एका दलालाच्या माध्यमातून तिचे लग्न राजस्थानमधील एका तरुणासोबत ठरवले होते, असा या अल्पवयीन मुलीचा आरोप आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील हे धक्कादायक प्रकरण आहे. शनिवारी कौशांबीतील सैनी पोलीस स्टेशन परिसरातील अटसराय गावाजवळ असलेल्या एका ढाब्यावर पीडिता मोठ्याने ओरडू लागल्यानंतर हे प्रकरण उघड झालं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता बिहारची रहिवासी आहे. कौशांबीतील ढाब्यावर पोहोचल्यानंतर पीडितेने नवऱ्यासोबत जाण्यास नकार देत गोंधळ घातला.
या मुलीने सांगितले की ती बिहारची रहिवासी आहे आणि तिच्या आई-वडिलांनी दलालाच्या माध्यमातून तिची विक्री राजस्थानमधील मनोहर नावाच्या ३० वर्षीय तरुणासोबत केली होती.
( नक्की वाचा : रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य )
दीड लाख रुपयात विक्री
मुलीने आई-वडिलांवर दीड लाख रुपये घेऊन विकल्याचा आरोप केला आहे. आरोपी तरुण तिला जबरदस्तीनं राजस्थानमध्ये घेऊन जात होता असा तिचा आरोप आहे. ती सैनी पोलीस स्टेशन परिसरातील अटसराय गावाजवळ पोहोचली, तेव्हा तिने लघवीला जाण्याचा बहाणा केला. याच दरम्यान ती ढाब्यावर उतरली आणि गोंधळ घालू लागली.
तरुणाने मुलीला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने रडत जाण्यास नकार दिला. यावर ढाब्यातील कर्मचाऱ्यांनी मुलीची बिकट परिस्थिती पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीची चौकशी केली.
या मुलीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडिलांनी आर्थिक फायद्यासाठी दलालाच्या माध्यमातून तिचे लग्न लावले होते. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. त्याचबरोबर या मुलीला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.