मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथे 29 वर्षीय रितिका सेनची तिच्या लिव्ह-इन पार्टनर सचिन राजपूतने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह फक्त ब्लँकेटमध्ये गुंडाळून बेडवर ठेवला नाही, तर दोन दिवस त्याच खोलीत मृतदेहाजवळ तो झोपला. जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात तो वावरत होता. हे प्रकरण 27 जूनच्या रात्री बजरिया पोलीस स्टेशन हद्दीत घडलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सचिन आणि रितिका हे दोघे ही लिव्ह इन मध्ये राहात होते. गायत्री नगर, कररिया फार्म परिसरात ते राहत होते. 27 जूनला या दोघांमध्ये रात्री वाद झाला होता. रितिका एका खाजगी कंपनीत काम करत होती. तर सचिन सध्या बेरोजगार होता. रितिकावर तो संशय घेत होता. तिचं तिच्या बॉससोबत अफेअर असल्याचा त्याला संशय होता. हा वाद इतका वाढला की सचिनने रितिकाचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर सचिनने रितिकाचा मृतदेह ब्लँकेट आणि चादरीत गुंडाळून बेडवर ठेवला. त्यानंतर तो त्याच खोलीत होता. तिच्या मृतदेहा बाजूला बसून तो दारू पीत राहिला.
तिला ठार केल्यानंतर पुढील दोन दिवस तो त्याच मृतदेहाजवळ झोपला. सचिन हा आधीच विवाहित आहे. शिवाय दोन मुलांचा बाप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सचिनने आपला मित्र अनुजला दारूच्या नशेत हत्येबद्दल सांगितलं होतं. पण मित्राने त्याला गांभीर्याने घेतलं नाही. सोमवार सकाळी, जेव्हा त्याने पुन्हा तीच गोष्ट सांगितली, तेव्हा अनुजला संशय आला. त्याने संध्याकाळी 5 वाजता डायल-100 वर फोन केला. त्याने हत्येबाबतची पोलिसांना माहिती दिली. बजरिया पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा दरवाजा उघडताच ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला रितिकाचा मृतदेह बेडवर मिळाला. सचिनने जे सांगितलं होतं, ते सगळं खरं निघालं.
पोलीस स्टेशन प्रभारी शिल्पा कौरव यांनी NDTV ला सांगितलं की, महिलेचं नाव रितिका सिंग आहे. ती तिचा बॉयफ्रेंड सचिन राजपूतसोबत इथे राहत होती. तो विदिशा जिल्ह्यातील सिरोंजचा रहिवासी आहे. साडेतीन वर्षांपासून ते लिव्ह-इनमध्ये होते. जिथे घटना घडली आहे तिथे 9-10 महिन्यांपासून राहत होते. त्यांनी सांगितलं की, 27 जून रोजी दोघांमध्ये वाद झाला. तो इतका वाढला की आरोपीने आपल्या प्रेयसीचा गळा दाबून तिची हत्या केली. नंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून निघून गेला. पोलिसांनुसार, आरोपीने दारूच्या नशेत ही गोष्ट आपल्या मित्राला सांगितली होती. तेव्हा मित्राला विश्वास बसला नाही. पण नशा उतरल्यानंतर सांगितल्यावर मित्राने पोलिसांना माहिती दिली.