Mass dog killing : 'भूतदया परमो धर्मा...' शाळेच्या मूल्यशिक्षणाच्या वर्गातही भूतदयेचं शिक्षण दिलं जातं. मात्र भूतदयेला वेशीवर टांगत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणात भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तेलंगणातील हनमकौंडा जिल्ह्यातील तब्बल ११०० कुत्र्यांची विषारी इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली आहे.
११०० कुत्र्यांची सामूहिक हत्या...
तेलंगणातील हनमकौंडा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. हनमकौंडा जिल्ह्यातील 'पाथिपाका' गावात सुमारे २०० कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राणी प्रेमी कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ पासून आतापर्यंत राज्यात तब्बल ११०० हून अधिक कुत्र्यांचा अशा प्रकारे बळी घेण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या क्रूर कृत्यामागे एक धक्कादायक कारण समोर येत आहे. स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांनी ग्रामस्थांना 'भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुक्तता' करण्याचं आश्वासन दिलं होतं. हेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आणि ग्रामपंचायत सचिवांनी या मुक्या प्राण्यांची कत्तल केल्याचा आरोप होत आहे.
क्रूर कृत्य कसं आलं उघडकीस?
'स्ट्रे ॲनिमल फाउंडेशन ऑफ इंडिया'चे कार्यकर्ते ए. गौतम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, कुत्र्यांना विष देऊन मारल्यानंतर त्यांचे मृतदेह एका स्मशानभूमीत पुरण्यात आले होते. यापूर्वीही हनमकौंडा येथील श्याम्पेट आणि अरेपल्ली भागात ३०० कुत्र्यांची हत्या झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन महिला सरपंचांसह त्यांच्या पतींवर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्राणी प्रेमी संघटनांनी या अमानवी प्रकाराचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांच्या निर्बीजीकरणावर (Sterilization) भर द्यावा, असं आवाहनही कार्यकर्त्यांनी केलं आहे.