Police Officer Durga Kharde Viral Video: मुंबईतल्या व्हीपी रोड पोलिस ठाण्यात (VP Road Police Station) शनिवारी घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तक्रार नोंदवायला आलेल्या महिला आणि तिच्या साथीदारासोबत वाद झाल्यानंतर तिथे कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) दुर्गा खर्डे यांनी आपले भान हरपले. संतापाच्या भरात त्यांनी वर्दीवरील नावपट्टी काढून तक्रारदार महिलेकडे फेकली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल होताच चांगलाच गदारोळ माजला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी पोलिसांना फोन आला होता की एका ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसखोरी झाली आहे. तक्रारदाराने पोलिसांकडे जयेशकुमार सोनार आणि यश योगेश करांडे या दोघांविरोधात तक्रार केली होती. पेट्रोलिंग टीमने दोन्ही बाजूंना पोलिस ठाण्यात आणलं. ठाण्यात आल्यानंतर करांडे आणि त्याची साथीदार रुची पाल यांनी तक्रारदारावर लोकांचे पैसे थकले असल्याचा दावा करत पोलिसांकडे वसुली करून देण्याची मागणी केली. अन्यथा त्या व्यक्तीवर एफआयआर दाखल करण्याचा आग्रह धरला.
पोलिसांनी हा वाद नागरी स्वरूपाचा असल्याचे सांगून एफआयआर घेण्यास नकार दिला. यानंतर करांडे आणि पाल यांनी पोलिस ठाण्यातच जोरजोरात आरडाओरडा करत मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. याचवेळी पीएसआय दुर्गा खर्डे एका मृत व्यक्तीच्या जबाबाशी संबंधित गंभीर तपासात व्यस्त होत्या. परंतु सुरू असलेला गोंधळ आणि मोबाईल कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग यामुळे त्यांना कामात अडथळा येऊ लागला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, करांडेने मुद्दाम खर्डे यांच्या चेहऱ्यावर मोबाईल कॅमेरा फोकस केला आणि सतत रेकॉर्डिंग करत राहिला. यामुळे खर्डे यांना अपमानास्पद आणि अस्वस्थ वाटल्याने त्यांनी चिडून नावपट्टी काढून फेकली. हा प्रकार करांडेनं सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद आणखी पेटला. अखेर या प्रकरणाची चौकशी गिरगाव विभागाचे एसीपी ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते सोमवारीपासून तपास सुरू करतील.
दरम्यान, तक्रारदार लोकेन्द्रसिंह राव यांच्या फिर्यादीवरून व्हीपी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1333/2025 दाखल करण्यात आला आहे. यात बीएनएसच्या विविध कलमांचा समावेश असून, आरोपी जयेशकुमार सोनार (22) आणि यश योगेश करांडे (23) यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच करांडेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एक एनसीही नोंदवली आहे.