सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघड झाली आहे. येथील एका विवाहित महिलेचा तिच्या पतीस तीन जणांनी छळ केला. त्यांनी या महिलेचं जबरदस्तीने मुंडण करत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देखील दिला. या प्रकरणात पीडित महिलेनं बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, 'या' महिलेचे 2016 साली लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरु होतं. पण, नंतर तिला तिची नणंद आणि मेव्हण्याचं अफेयर असल्याची माहिती समजली. हा प्रकार तिनं तिच्या नवऱ्याला सांगितला. त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं.
घरातील वादाला कंटाळून आपण काही काळ पुण्यात राहायला गेले होते. नवऱ्यानं आपली समजूत घालून परत घरी आणलं. काही काळ सर्व सुरळीत सुरु होतं. पण, आपण केलेल्या तक्रारीचा राग नवरा, नणंद आणि मेव्हण्याच्या मनात होता, असा आरोप पीडित महिलेनं केला.
( नक्की वाचा : शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, आणि सुरु झाला खेळ! शाळेत बोलावलं आणि... )
8 मार्च 2025 रोजी पती, नणंद आणि मेव्हण्याने एकत्र येत तिला बेदम मारहाण केली. मेव्हण्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. नणंदेने केस ओढले आणि पतीने लाथाबुक्यांनी मारहाण करत चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवत चेहरा विद्रुप केला आणि जबरदस्तीने मुंडण करण्यास भाग पाडले, ' असा गंभीर आरोप पीडित महिलेनं केला आहे.
या प्रकरणाची कुठं तक्रार केली तर मला आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली होती. त्यामुळे आपण काही काळ गप्प होतं. पण, हा त्रास असह्य झाल्यानं बहिणीच्या घरी धाव घेतली. त्यानंतर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली आहे, अशी माहिती पीडितेनं दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, नणंद आणि मेव्हण्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.