संविधानाची विटंबना झाल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला होता. त्यावेळी आंदोलनामध्ये असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र त्याचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाला नाही. तर त्याला श्वसनाचा आजार होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शिवाय दहा लाखाची मदतही जाहीर केली. त्यानंतर सोमनाथ यांच्या आई आणि भावाने संताप व्यक्त करत सरकारच्या भूमीकेवर संशय व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमनाथ सुर्यवंशी यांना श्वसनाचा आजार होता. शिवाय त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाणही झाली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र फडणवीसांच्या या उत्तरावर सोमनाथ यांच्या आईने संताप व्यक्त केला आहे. माझा मुलगा जसा जिवंत होता, तसा मला पाहिजे. माझ्या मुलाने कोणाचा खून केला नव्हता. त्याचा पोलिसांनी बळी घेतला आहे. माझ्या मुलाच्या अंगावर एकही कपडा न ठेवता त्याला मारला असा आरोपही त्यांच्या आईने केला आहे. त्याला मारून त्याचा पोलिसांनी जीव घेतला. त्यामुळे सरकारने त्यांचे दहा लाख त्यांच्याकडे ठेवावेत. त्यांनी माझा मुलगा परत करावा असं सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई म्हणाले.
सरकारच्या भूमीकेवर सोमनाथ यांच्या भावानेही शंका व्यक्त केली आहे. सोमनाथ यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांना मल्टिपल इंजरी झाल्याचे समोर आले आहे. अशा वेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका कसा आला असा प्रश्न त्यांच्या भावाने उपस्थित केला आहे. जर ह्रदयविकाराचा झटका आला होता मग आम्हाला का कळवलं नाही अशी विचारणाही त्यांनी केली आहे. सरकारने मदत जाहीर केली आहे. त्यावर त्यांनी राग व्यक्त केला आहे. आम्हाला मदत नको न्याय हवा आहे. आम्ही काय भिकारी नाही. कष्ट करून खाणाऱ्यांची औलाद आहे. रक्ताचं पाणी करून आई वडिलांनी त्याला शिकवलं होतं. त्यांना आमच्या कष्टाचं काय मोल समजणार असंही ते म्हणाले. शिवाय शिवाय त्यांना श्वसनाचा आजार नव्हता. जर कोणता आजार असता तर तो आम्हाला समजला असता असंही ते म्हणाले.
त्यामुळे सरकारकडून जो दावा करण्यात आला आहे तो सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई आणि भावाने साफ फेटाळून लावला आहे. त्यांच्या या ठाम भूमीकेमुळे सरकारपुढील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. संविधानाची विटंबना झाल्याचा प्रकार परभणीत 10 डिसेंबर ला घडला होता.त्याचे पडसात 11 डिसेंबरला उमटले होते. त्यावेळी जमाव हा हिंसक झाला होता. जागजागी आंदोलन होत होते. त्याच वेळी पोलिसांनी काही जणांची धरपकड केली होती. त्यात सोमनाथ सुर्यवंशी यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला होता.