Spy Racket Busted: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्याचवेळी भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सुरक्षा यंत्रणानांनी पंजाब आणि हरियाणातून सहा हेरांना अटक केलीय. हरियाणातील कैथल, हिसार, नूह आणि पानीपत तसेच पंजाबमधील मालेरकोटला येथून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानी अधिकाऱ्याशी संपर्क
भारत सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशला 24 तासांमध्ये देश सोडण्याचा आदेश दिला होता. दानिशच्या सांगण्यावरून काम करणाऱ्या एकूण 6 पाकिस्तानी हेरांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. हे सर्व दानिशच्या संपर्कात होते.
सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला भारताची गोपनीय लष्करी माहिती पाठवण्याच्या आरोपात हरियाणातील हिसारमधून महिला यूट्यूबर ज्योती राणीला अटक केली आहे. ज्योती 2023 मध्ये तिच्या ‘ट्रॅव्हल विथ जो' या ट्रॅव्हल चॅनेलच्या शूटिंगसाठी पाकिस्तानला गेली होती. जिथे पाकिस्तान दूतावासातील एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली. तेव्हापासून ती सतत भारतविरोधी माहिती पाकिस्तानला पाठवत होती.
( नक्की वाचा : PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन? )
ज्योतीच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे
ज्योतीच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. ज्योतीनं सांगितलं की, 'मी 2023 मध्ये पाकिस्तानच्या व्हिसासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले होते. तिथं माझी भेट एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. मी दोनदा पाकिस्तानचा दौरा केला.
पाकिस्तानमध्ये दानिशच्या सांगण्यावरून मी त्याच्या परिचयातील अली अहवानला भेटले. अलीने माझ्या राहण्याची आणि फिरण्याची व्यवस्था केली होती. पाकिस्तानमध्ये अली अहवानने माझी पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली. तिथेच माझी शाकिर आणि राणा शहबाज यांच्याशीही भेट झाली. मी शाकिरचा मोबाईल नंबर घेतला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून माझ्या मोबाईलमध्ये शाकिरचा नंबर जट रंधावा या नावाने सेव्ह केला होता. त्यानंतर मी भारतात परत आले.'
'मी व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्या सर्वांच्या संपर्कात होते. त्यांना देशविरोधी माहिती पाठवली, अशी माहितीही ज्योतीनं दिली आहे. दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशला अनेकवेळा भेटल्याचंही तिनं कबुल केलं आहे. ज्योतीवर भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवून भारताची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचा आरोप आहे.
हे आरोपीही अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात 32 वर्षांच्या गजालालाही अटक करण्यात आली आहे. गजाला दानिशसोबत आर्थिक व्यवहारात सहभागी होती. त्याला व्हिसा प्रक्रियेत मदत करत होती. याशिवाय यामीन मोहम्मदला अटक करण्यात आलीय. तो दानिशला हवाला आणि इतर माध्यमातून पैसे पोहोचवण्यात मदत करत होता.
हरियाणातील कैथल येथून देविंदर सिंह ढिल्लोंला अटक करण्यात आली आहे. हा पाकिस्तानच्या दौऱ्यात संपर्कात आला होता. त्याने पटियाला कॅन्टोन्मेंटचे व्हिडिओ पाकिस्तानी एजंट्सना पाठवले होते. याशिवाय हरियाणातील नूह येथून अरमान नावाच्या स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याने भारतीय सिमकार्ड पुरवले. तसंच 2025 मध्ये पाकिस्तानी एजंट्सच्या निर्देशानुसार डिफेन्स एक्सपोच्या साइटला भेट दिली होती.