उत्तरप्रदेश: मृत्यूनंतर काय होतं? आत्मा कुठे जातो? याबाबतचे रहस्य जाणून घेण्यासाठी नववीमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली असून मुलाने गोळी झाडून घेत स्वतःचे आयुष्य संपवले. या दुर्दैवी घटनेने मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या युवराज राणाने गुगल आणि यूट्यूबवर 'गरूड पुराण', 'मृत्यूनंतर काय होते', 'मृत्यूचे मार्ग' आणि 'मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो' याबाबत सर्च केले. त्यानंतर या मुलाने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री मेरठ शहरातील अॅपेक्स कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युवराज राणाने स्वतःवर गोळी झाडली. या प्रकरणी कुटुंबाने अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. मुलाला पिस्तूल कुठून मिळाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आई आणि भावाने ओरडल्यामुळे तसेच त्याची बुलेट गाडी विकल्याच्या रागातून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्याची आई एका वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका आहे. त्याची आई आणि भाऊ वाईट संगत सोडण्याचा सल्ला देत होते. तसेच त्याने त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवू नये म्हणून त्यांनी त्याची बुलेट बाईकही विकली. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या फोनवर गुगलवर “मृत्यू” आणि यूट्यूबवर “मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते” असे सर्च केले. घटनेच्या वेळी तो बाल्कनीत उभा होता. आई आणि भाऊ ड्युटीवरून घरी परतल्यावर, विद्यार्थ्याने त्याच्या खोलीत जाऊन स्वतःवर गोळी झाडली.
( नक्की वाचा : Sharad Pawar vs Amit Shah : शरद पवार अमित शाहांना हिणवतात 'ते' प्रकरण काय आहे? )
युवराज राणाचे कुटुंब कुटुंब मूळचे बुलंदशहरचे आहे. वर्षभरापूर्वी वडिलांचे आजाराने निधन झाले होते, त्यानंतर हे कुटुंब मेरठमधील जागृती विहार येथे भाड्याच्या घरात राहत होते. सहा महिन्यांपूर्वीच त्याने पोलीस स्टेशन भवनपूर परिसरातील अॅपेक्स कॉलनीत आपले घर खरेदी केले होते. शनिवारी रात्री आई आणि मोठा भाऊ घरी परतले तेव्हा विद्यार्थ्याचे वर्तन सामान्य नव्हते. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.