कन्नड अभिनेता दर्शन याने कर्नाटक उच्च न्यायालयासमोर एक याचिका दाखल केली आहे. आपल्याला झोपण्यासाठी पलंग, वाचायला पुस्तके आणि घरचे अन्न मिळावे यासाठी त्याने विनंती केली आहे. तुरुंगातील अन्न खाल्ल्याने आपल्याला जुलाब होत असल्याची त्याने तक्रार केली आहे. ही याचिका पाहिल्यानंतर न्यायालयाने म्हटले की सगळ्यांसाठी कायदा समान असून कायद्यानुसारच या याचिकेबाबत विचार केला जाईल.
न्यायमूर्ती एस.आर.कृष्णकुमार यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. तोपर्यंत तुरुंग प्रशासन, कामाक्षीपाल्या पोलीस आणि राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले की विविध आरोपांखाली अटक झालेले आरोपी आणि शिक्षा भोगत असलेले कैदी यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. या निमयानुसार या याचिकेवर निर्णय घेतला जाईल. या एकल खंडपीठाने आरोपीच्या वकिलांना उद्देशून म्हटले की घरचे अन्न आरोपींना देण्याची परवानगी आहे असं सांगून फायदा नाही इतर न्यायालयांनी यासंदर्भात दिलेले आदेश सादर करावेत. खंडपीठाने म्हटले की, जर कायद्यात तरतूद असेल तरच घरचे अन्न देण्यासाठीची परवानगी दिली जाईल जर कायदा यासाठीची परवानगी देत नसेल तर मग घरचे अनेन आरोपीला देता येणार नाही. सदर याचिकेवर अन्य याचिकांप्रमाणेच विचार केला जाईल आमि निर्णय हा कायद्याला धरून घेतला जाईल.
अभिनेता दर्शनतर्फे के.एन.फणींद्र हे बाजू मांडत असून त्यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, त्यांच्या अशिलाला तुरुंगातील अन्न पचत नाहीये. अन्न पचत नसल्याने त्याला सतत जुलाब होत आहेत. तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून अभिनेता दर्शनची तपासणी केली असता त्याला इन्फेक्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोटात अन्नाचा कणही राहात नसल्याने दर्शनचे वजन झपाट्याने घटले आहे. दर्शनला घरचे अन्न मिळावे यासाठी तोंडी विनंती तुरुंग प्रशासनाला करण्यात आली होती मात्र तुरुंग प्रशासनाने ती फेटाळून लावली आहे.
वकील फणींद्र यांनी म्हटले की, "दर्शनचं वजन कमी होतंय. त्याला व्याधी होण्याची शक्यता आहे. तुरुंग कायदा 1963 च्या 30 व्या कलमानुसार कैद्यांना बाहेरून अन्न, कपडे आणि पलंग मिळण्याची सुविधा आहे." अभिनेता दर्शन याला रेणुकास्वामी याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दर्शनची 12 दिवस चौकशी करण्यात आली असून त्याला 22 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रेणुकास्वामी हत्या प्रकरण
अभिनेता दर्शन याने त्याच्या साथीदारांसह मिळून 8 जून रोजी रेणुकास्वामी याची हत्या केली होती. रेणुकाचे चित्रदुर्गमधून अपहरण करून त्याला बंगळुरूला आणण्यात आले होते. रेणुकाचा अनन्वित छळ करून नंतर त्याला ठार मारण्यात आले होते. चित्रपटात दाखवतात तसे ठार मारल्यानंतर रेणुकाचा मृतदेह गटारामध्ये फेकून देण्यात आला होता. काही कुत्र्यांनी त्याचा मृतदेह बाहेर खेचून काढला होता. यानंतर रेणुकाचा मृतदेह जवळच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्यांना दिसून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर 4 आरोपी पोलिसांना शरण आले होते. त्यांनी या खुनाची जबाबदारी स्वीकारली होती. आर्थिक व्यवहारातून हा खून केल्याचा त्यांनी दावा केला होता. मात्र जेव्हा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा पोलिसांना दर्शन आणि त्याची प्रेयसी पवित्रा गौडा यांच्या सहभागाचा उलगडा झाला. रेणुकाने पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवले होते ज्याचा राग आल्याने दर्शनने रेणुकाचे अपहरण करून त्याची हत्या केली होती.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )