Tahawwur Rana : मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा आता भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. गेल्या 17 वर्षांपासून राणाला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात येत होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर अमेरिकेनं राणाला भारताकडे सोपवलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सध्या राणाची चौकशी करत आहे. त्याच्या चौकशीतून संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या 26/11 च्या हल्ल्यातील अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिल्या दिवसाच्या चौकशीमध्ये काय झालं?
तहव्वूर राणानं पहिल्या दिवशी तपास यंत्रणांना संपूर्णपणे सहकार्य केलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. पहिल्या दिवशी NIA नं त्याच्या पार्श्वभूमीचा तपास केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणा हा पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील चिचबुतनी या गावातील रहिवाशी आहे.
त्याचे वडिल शाळेचे मुख्याध्यापक होते. त्याला दोन भाऊ आहेत. त्यापैकी एक लष्करात मनोविकारतज्ज्ञ तर दुसरा पत्रकार आहे. राणा 1997 साली त्याच्या डॉक्टर पत्नीसह कॅनडामध्ये शिफ्ट झाला. त्यानं तिथं इमिग्रेशन सर्विस आणि हलाल मीटचा व्यवसाय सुरु केला.
( नक्की वाचा : Tahawwur Rana : 26/11 चा आरोपी तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं, त्याला फाशी होणार का? )
राणाला पाकिस्तानी लष्कराची वर्दी घालण्याचं मोठं वेड होतं. तो पाकिस्तानी आर्मी सोडल्यानंतरही अनेकदा त्याची वर्दी घालत असे. ही वर्दी घालूनच तो सज्जीद मीर, मेजर इक्बाल या मुंबई हल्ल्यामधील प्रमुख आरोपींना भेटायला जात असे.
साजिद मीर हा 26/11 हल्ल्याचा मुख्य हँडलर आहे. तो कराचीमधून मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांना आदेश देत होता. तर मेजर इकबाल हा ISIचा अधिकारी आहे. तो हल्ल्याचा हँडलर साजिद मीरसोबत काम करायचा आणि पाक लष्कराबरोबर संवाद साधत असे.
तहव्वूर राणानं लष्कर-ए-तोयबा आणि हरकल-उल-जिहाद या दहशतवादी संघटनेच्या शिबिरांचाही दौरा केला होता, अशी माहिती सुरुवातीच्या तपासामध्ये समोर आली आहे. त्यानं हा दौरा पाकिस्तानी लष्कर आणि ISI च्या अधिकाऱ्यांसोबत आर्मीच्या वर्दीमध्ये केला होता.
राणाची भारतविरोधी मानसिकता आणि दहशतवादी संघटनेशी त्याची जवळीक पाहता तो एक खतरनाक कारस्थानी आहे, अशी माहिती तपासातून पुढे आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आता पुढील काही काळ तहव्वूर राणावर न्यायालयीन प्रक्रिया चालेल....त्यानंतर भारतामध्ये राणावरचे आरोप सिद्ध झाले की त्याच्या शिक्षेचा फैसला होईल. या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.