विद्यार्थ्याचं अक्षर खराब म्हणून संतापली शिक्षिका, अशी दिली शिक्षा की वाचून उडेल थरकाप

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Teacher : या प्रकरणात शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो Gemini AI)
मुंबई:

सुनील महाडेश्वर, प्रतिनिधी

हस्ताक्षर खराब असल्याचे कारण देत मालाड मधील खासगी शिकविणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने 8 वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाताला मेणबत्तीचे चटके दिले आहेत. या कृत्यामुळे मुलाचा हात भाजला आहे. कुरार पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील तक्रारदार मुस्तकिन खान (50) हे मालाड पूर्वेला पिंपरीपाडामध्ये राहतात. त्यांचा मुलगा मोहम्मद हमजा खान (8) हा लक्षधाम शाळेत तिसरीत शिकतो. तो मालाड पूर्वेच्या गोकुलधाम येथील जेपी डेक्स इमारतीत राजश्री राठोड नावाच्या महिलेकडे शिकवणीसाठी जात होता. दररोज संध्याकाळी ७ ते ९ असे दोन तास ही शिकवणीचे वर्ग चालत होते. 28 जुलै रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे हमजाची बहीण रूबिनाने त्याला शिकवणीसाठी राठोडच्या घरी सोडले होते. रात्री नऊच्या सुमारास शिक्षिका जयश्री राठोडने हमजाचे वडील  मुस्तकीन खान यांना फोन केला. हमजा खूप रडत असून त्याला त्वरीत घरी घेऊन जा, असे तिने सांगितले. 

( नक्की वाचा : कोर्टातील 'केमिस्ट्रीचा क्लास' वाया, महिला प्राध्यापिकेला पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप )
 

जळत्या मेणबत्तीवर हात धरून शिक्षा

हमजाची मोठी बहिण रूबीना त्याला घेण्यासाठी गेली होती. तेव्हा हमजा खूप रडत होता. त्याच्या उजव्या हातावर भाजल्याचा गंभीर जखमा दिसून आल्या. रूबिनाने याबाबत राठोड यांना विचारले, तेव्हा तिने टोलवाटोवलीची उत्तरं दिली. घरी परतल्यावर हमजाने वडिलांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. राठोड टिचरने हस्ताक्षर खराब असल्याने शिक्षा म्हणून हात मेणबत्तीवर धरला होता असे हमजाने सांगितले. याबाबत खान यांनी राठोड यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने मुलांना ‘शिस्त लावण्यासाठी' तिने हे कृत्य केल्याची कबुली दिली.अशा प्रकारची शिक्षा देणे अमानवी कृत्य असून त्याबात खान यांनी जाब विचारला. त्यावेळी जयश्री राठोडनेच उलट शिविगाळ केली, असे खान यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

शिक्षिकेवर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल 

हमजाला उपचारासाठी कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी) नेण्यात आले. खान यांनी कुरार गाव पोलीस ठाण्यात जयश्री राठोड विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलम ७५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या ११५ (२), ११८ (१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Topics mentioned in this article