Tenant Couple Kills Landlord : एका भाडेकरू दांपत्याने आपल्याच मालकिणीसोबत जे केलं, ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. रागाच्या भरात माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचं विषण्ण करणारं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. तब्बल 6 महिन्यांचं भाडं थकलं होतं आणि याच पैशांच्या वादातून एका महिलेला आपली जीवनयात्रा संपवावी लागली. पण हा केवळ खून नव्हता, तर त्यानंतर जे घडलं ते कोणत्याही थरारपटापेक्षा कमी नव्हतं.
काय आहे प्रकरण?
मालकिणीने वारंवार भाड्यासाठी तगादा लावल्याने वैतागलेल्या पती-पत्नीने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यांनी तिला भाडे घेण्यासाठी घरी बोलावलं आणि तिथेच तिचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे, खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका शॉपिंग ट्रॉली बॅगेत भरून बेडच्या आत लपवून ठेवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची त्यांची पूर्ण तयारी झाली होती, पण त्याआधीच नशिबाने त्यांना साथ दिली नाही आणि हे क्रूर कृत्य उघडकीस आलं.
कुठे घडला हा थरार?
ही थरकाप उडवणारी घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. राजनगर एक्सटेंशन परिसरातील ओरा काइमेरा सोसायटीच्या टॉवर F मधील फ्लॅट नंबर 506 मध्ये हा प्रकार घडला. दीपशिखा शर्मा असं मृत महिलेचं नाव असून त्या याच सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्यांच्या मालकीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये अजय गुप्ता आणि त्याची पत्नी आकृती गुप्ता हे गेल्या 8 महिन्यांपासून भाड्याने राहत होते.
( नक्की वाचा : Shocking : 18 वर्षे बुरख्यात ठेवलं,वडिलांना भेटू दिलं नाही; एका चुकीमुळे पत्नी अन् चिमुरड्यांची केली हत्या )
सुमारे 90 हजार रुपये भाडे थकल्यामुळे वाद सुरू होता. बुधवारी पैसे नेण्यासाठी दीपशिखा या गुप्ता दांपत्याच्या घरी गेल्या होत्या. मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने शोध सुरू केला. सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या गुप्ता यांच्या घरात गेल्याचं दिसलं, पण बाहेर आल्याचं कुठेही नोंद नव्हती. जेव्हा लोक तिथे पोहोचले, तेव्हा सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या या दांपत्याने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली.
दोघांचाही सहभाग
या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी अजय गुप्ता म्हणतोय की, त्याने एकट्यानेच हे केलं आहे. मात्र, त्याच वेळी त्याची पत्नी आकृती गुप्ता ओरडून सांगते की, मी सुद्धा यात सामील होते आणि आम्ही दोघांनी मिळून हे केलं आहे. मानसिक त्रास दिला जात असल्याचा दावा या दांपत्याने केला आहे. पोलिसांनी सध्या या दोन्ही आरोपींना अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.