निनाद करमरकर
घरात आणि गॅलरीत टॉवेल लावून फिरतो, म्हणून एका इसमाला स्थानिकांनी नग्न करून बेदम मारहाण केली आहे. ही घटना ठाण्याच्या शीळ डायघर परिसरात घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ज्या इसमाला मारहाण करण्यात आली आहे त्याचं वय 45 वर्ष आहे. हा व्यक्ती आक्षेपार्ह पद्धतीने फिरत असल्याचा गावकऱ्यांचा आक्षेप होता. त्यामुळेच त्याला धडा शिकवण्यासाठी त्याला थेट मारहाण करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शीळ डायघरच्या खर्डी भागातील एका इमारतीत मुस्तकिन खान हा व्यक्ती राहतो. तो दररोज बाथरुममधून टॉवेलवर बाहेर येतो. त्यानंतर बाल्कनी, तसंच घरात तसाच फिरतो. त्यानंतर टॉवेल सोडतो. मात्र यावेळी त्याच्या खिडकीचे पडदे उघडे असतात. ज्यामुळे समोरच्या फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि विशेषतः महिलांना लज्जा उत्पन्न होते. असा स्थानिकांचा आरोप आहे. वारंवार हे होत असल्याने स्थानिक संतापले होते. त्यांच्या रागाचा पारा वर चढला. त्याचा अखेर विस्फोट झाला.
ट्रेंडिंग बातमी - वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?
याबाबत स्थानिकांनी व्हिडीओ देखील चित्रित केले. त्याला याबाबत सांगण्यात आलं. असं करू नको म्हणून ही बजावलं. मात्र तरीही मुस्तकीन खानचे हे प्रकार सुरूच होते. असं स्थानिकांनी सांगितलं आहे. शेवटी संधी साधत स्थानिकांनी त्याला इमारतीखाली आणले. त्याला नग्न करत बेदम मारहाण केली. 1 जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा समोर आलाय.
या मारहाणीत जखमी झालेल्या या इसमाला उपचारांसाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या मारहाणीचे समिश्रा प्रतिक्रीया या परिसरात उमटत आहेत. स्थानिकांनी ताकीद देवूनही मुस्तकीन खान असं कृत्य करत होता. त्यामुळे त्याला सबक शिकवणं गरजेचं होतं असंही इथे राहणारे लोक सांगत आहेत.