अमजद खान
पार्किंगच्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाली. हत्येनंतर एका संशयीत आरोपीला ठाणे जीआरपीने ताब्यात घेतले. मात्र आरोपीच्या पत्नीने पोलिसांवर पैसा मागितल्याचा आरोप केला. या प्रकरणात रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी ठाणे जीआरपीमधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. आत्ता संशयित आरोपीच्या तक्रारदार पत्नीने यू टर्न घेतला आहे. मला एका व्यक्तीने आधी तक्रार करण्यास भाग पाडले. मला माहिती नव्हते काय चालले आहे. आत्ता मी पुन्हा या प्रकरणात पोलिस आयुक्तांकडे अर्ज दिला आहे. या प्रकरणाची निपक्ष चौकशी झाली पाहिजे. पोलिसांच्या विरोधात निलंबनाची झालेली कारवाई चुकीची आहे. असा पत्र व्यवहार महिलेने पोलीस आयुक्तांकडे केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाणे जीआरपीच्या हद्दीत दिघा परिसरात पार्किंगच्या वादातून अर्जून शर्मा या व्यक्तीची काही दिवसापूर्वी हत्या झाली होती. या प्रकरणात ठाणे जीआरपी पोलिसांनी तपास सुरु केला होता. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी देवीचरण पाल या व्यक्तीला संशयीत आरोपी म्हणून अटक केली. देवीचरण पालच्या अटकेनंतर पोलिस या प्रकरणात आणखीन आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र हे प्रकरण सुरु असताना देवीचरण पाल याची पत्नी अंजू देवीचरण पाल यांनी ठाणे जीआरपी पोलिसांच्या विरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली.
पोलिसांनी तिच्याकडे पैसे मागितले होते, असा आरोप अंजु देवी यांनी केला होता. ही तक्रार समोर येताच ठाणे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, अमोल अर्जून आणि विजय बागले यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर एकच आश्चर्य व्यक्त केले गेले. पैसे मागितलेच नाही. कारवाई कशी झाली. ही चर्चा सुरु झाली. या दरम्यान तक्रार करणाऱ्या अंजू देवीचरण पाल यांनी या प्रकरणात पुन्हा एक अर्ज पोलिस आयुक्तांना आणि ठाणे जीआरपीच्या वरिष्ठ पोलिसांना दिला आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन मी तक्रार दिली केली होती. माझी कोणाच्या विरोधात काही तक्रार नाही. माझ्या पतीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी एका व्यक्तीने हे सर्व करण्यास सांगितले. मला काही माहिती नाही. आता मी पोलिस आयुक्तांकडे पत्र व्यवहार केला आहे. या प्रकरणात निपक्षपणे तपास करण्यात यावा. पोलिसांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये, असं तिने म्हटलं आहे. आधी तक्रार त्या नंतर पोलिसां विरोधात निलंबनाची कारवाई, नंतर तक्रारदार महिलेचा यु टर्न, त्यामुळे या प्रकरणात पोलिस आयुक्त या प्रकरणात काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.