अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
महाराष्ट्रातील 25 वाघांचा मारेकरी अखेर वनखात्याच्या जाळ्यात सापडला आहे. अजित राजगोंड उर्फ उर्फ अजित पारधी उर्फ महाराष्ट्राचा विरप्पन उर्फ बहेलिया टोळीचा म्होरक्या याला अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी होती शिकारीची पद्धत?
गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशातल्या बहेलिया टोळीनं विदर्भातल्या जंगलामध्ये वाघांच्या शिकारीचं सत्र सुरु केलं होतं. लोकांमध्ये बेमालूमपणे मिसळायचं... स्थानिक शिकाऱ्यांची ओळख करुन घ्यायची. आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलात वाघांची शिकार करायची असा त्यांचा डाव होता. पण राजुऱ्यात झालेल्या शिकारीमागे अजितचा हात असल्याचं समोर आलं आणि वनखात्यानं त्याला बेड्या ठोकल्या.
अजित राजगोंडला अटक तर झाली पण, त्याच्या चौकशीतून मिळालेली माहिती ही अजून धक्कादायक आहे. कारण, या शिकारीचे तार चंदपूरपासून थेट चीनपर्यंत पसरले आहेत.अजित राजगोंड हा महाराष्ट्रात वाघाची शिकार करायचा. त्या शिकारीतून वाघाचे वेगवेगळे अवयव मिळवत असे. या सगळ्या अवयवांना तस्करीद्वारे मेघालयात पाठवण्यात येत होते.
( नक्की वाचा : Bank Robbery : मॅनेजरनेच लुटली बँक, फिल्मी स्टाईलनं काढले 5 कोटी! कसा सापडला जाळ्यात? )
मेघालयात एक माजी सैनिकाला या अवयांची विक्री केली जात असे.माजी सैनिक लालनेईसंग त्यांची तस्करी चीनमध्ये करायचा. या सर्व कामाच्या मोबदल्यात त्याला भक्कम असा परतावा मिळत असे.
राज्यात 2013 मध्ये वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले होते. तेव्हाही बहेलिया टोळीनेच या शिकारी केल्याचे समोर आले होते. तेव्हा तब्बल 150 शिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती
यातील अनेक आरोपींना सात ते आठ वर्षांची शिक्षा झाली.पण बाहेर पडल्यानंतर या टोळीनं पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.या टोळीला वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. अन्यथा... जंगलांना लागलेली ही वाळवी वाघांच्या मुळावर उठेल.