CCTV Video: नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाशी त्याच्या आईचं सर्वात पवित्र नातं असतं. ते मुल जन्मल्यानंतर आईचं सारं विश्व मुलाभोवतीच असतं. मुलासाठी 'काय वाट्टेल ते' करण्याची, हवे तितके कष्ट घेण्याची आईची तयारी असते. पण, काही घटना अशा घडतात की त्यानं मन सुन्न होतं. एका आईनं तिच्या नवजात अपत्याला जन्म दिल्यानंतर थेट कचऱ्याच्या ढिगात फेकून दिले आणि ती फरार झाली. या निष्पाप बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी त्याला वाचवले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. तसंच या महिलेनं पोटच्या मुलाबाबत हा निर्दयी निर्णय का घेतला याचाही उलगडा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील टिकमगढमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील जिल्हा हॉस्पिटलच्या परिसरातील मुख्य गेटजवळच्या झुडपांमध्ये एका नवजात बाळाला टाकून देण्यात आले होते. बाळाच्या जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावले आणि त्यांनी पाहिले की, बाळाच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा होत्या. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून लोकांच्या अंगावर काटा आला. त्यांनी तात्काळ बाळाला उचलून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कोतवाली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ तपास सुरू केला.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
दोन बाईकस्वार आले, झाडीत टाकून गेले...
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन बाईकवर स्वार होऊन आलेली एक महिला आणि अन्य 3 जण घटनास्थळाजवळ दिसले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आपली शोधमोहीम तीव्र केली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर, पोलिसांनी संशयितांना कलेक्टोरेट रोड जवळील डॉ. मांडवी साहू यांच्या 'जीवन हॉस्पिटल' जवळून ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींमध्ये 3 तरुण आणि एक महिलेचा समावेश आहे. हे लोक छतरपूर जिल्ह्यातील घुवारा तहसीलच्या पडवा गावाचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
का घेतला निर्णय?
टीकमगढ पोलिसांनी मंगळवारी रात्री एका महिलेसह एकूण 3 लोकांना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ASP) विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या लोकांकडून चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात हे उघड झाले आहे की, ज्या तरुणीची प्रसूती झाली, ती विवाहित नाही. समाजात आपली बदनामी होईल या भीतीने, तिने हे क्रूर कृत्य केलं. बाळाची प्रसूती 'जीवन हॉस्पिटल'मध्ये झाली की अन्यत्र, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
मुलगी सज्ञान की अल्पवयीन?
पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी मुलीच्या आधार कार्डासह अन्य कागदपत्रे तपासणीसाठी मागवली आहेत. संबंधित मुलगी सज्ञान (Balig) आहे की अल्पवयीन (Nabalig), याचा पोलीस शोध घेत आहेत. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध नामजद एफआयआर (FIR) दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या बाळावर जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.