महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या देशभर काळजीचा विषय बनला आहे. कोलकाता तसंच बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणावर देशभर संताप व्यक्त होतोय. देशातील अन्य भागातही याच प्रकारच्या घटना उघड होत आहेत. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील फर्रूखाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पाहायला गेलेल्या मुलींचा मृतदेह आढळला आहे.
या मुलींच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी जन्माष्टमीचा उत्सव पाहण्यासाठी गेलेल्या त्यांच्या मुली घरी परतल्या नाहीत. मंगळवारी सकाळी आंब्याच्या झाडाला लटकलेला त्यांचा मृतदेहच सापडला. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त केले आहेत. तो फोन यापैकी एका मुलीचा असण्याची शक्यता आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मृत पावलेल्या दोन मुलींपैकी एकाच वय 18 तर दुसरीचं वय 15 वर्ष होतं. या मुलींच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, 'सोमवारी संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दोघी जवळच्या मंदिरात गेल्या होत्या. संध्याकाळी पाऊस सुरु झाल्यानं त्या रात्री 9 वाजता घरी आल्या. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा मंदिरात गेल्या.
रात्री 1 वाजता कार्यक्रम संपला. त्या बराच वेळ घरी परतल्या नाहीत. त्यानंतर आम्ही शोध सुरु केला. त्या दोघी काकूच्या घरी गेल्याचं एकानं सांगितलं. आम्ही तिथं गेलो. त्या काकूकडंही नव्हत्या. आमचे अनेक नातेवाईक तिथं जवळच राहातात. मुली त्यापैकी कुणा एकाच्या घरी झोपायला गेल्या असतील, सकाळी घरी येतील असं आम्हांला वाटलं.'
( नक्की वाचा : 'मिठी मारली, चुंबन घेतलं'... मल्याळम अभिनेत्रीनं सांगितला लैंगिक छळाचा अनुभव, दिग्गजांवर केले आरोप )
मंगळवारी सकाळी आंब्याच्या बागेत मुलींचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती आम्हाला समजली. आम्ही तातडीनं तिथं गेलो. आंब्याच्या झाडाला मृतदेह लटकलेले असल्याचं आम्हाला दिसलं. आमच्या मुलींची कुणीतरी हत्या केली आहे आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगला असावा, असा आमचा संशय आहे.
पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा
या मुलींची हत्या आहे की आत्महत्या हे पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट होईल, असं फर्रूखाबादचे पोलीस अधिक्षक प्रियदर्शी यांनी सांगितलं. आम्हाला घटनास्थळावर एक मोबाईल फोन आणि सिम कार्ड सापडले आहे. आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.