अल्पवयीन मुलीसोबत लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी खाली हिल्समधील नोंगथलीव गावातील आपल्या घरी असताना दोघे जण अचानक घरात शिरले. दोघांनी आधी मुलीवर चाकू हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र हल्ला झाल्यानंतर मुलीने बचावासाठी आरडा-ओरडा सुरु केला. मुलीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांना आरोपींना पकडलं.
(नक्की वाचा - कोपर्डीमध्ये दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल)
त्यानंतर जमलेल्या गर्दीने आरोपींना एका ठिकाणी नेलं आणि तिथे बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र लोकांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील गावकऱ्यांनी विरोध केला. पोलिसांनी लोकांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- किराणा दुकानात सुरू होती भलत्याच मालाची विक्री, धाडीनंतर पोलीसही चक्रावले)
मात्र एकीकडे चर्चा सुरु असताना लोकांना दोन्ही आरोपींना मारहाण सुरुच ठेवले. अखेर गर्दी कमी झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मजूर असल्याचं समजतंय. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु आहे.