एखादा व्यक्ती टाईम मशिनच्या माध्यमातून तरुण किंवा वृद्ध होतो हे तुम्ही अनेकदा चित्रपटातून पाहिलं असेल. हे फक्त चित्रपटांमध्येच शक्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात नाही. पण, आपण तरुण दिसावं अशी अनेकांची इच्छा असते. एखाद्या 60 वर्षांच्या व्यक्तीला तुम्ही टाईम मशीनचा आधार घेऊन 25 वर्षांचे व्हाल असं कुणी सांगितलं तर? ते कुणाला आवडणार नाही? लोकांच्या याच भावनांचा फायदा कानपूरमधील 'बंटी आणि बबलीनं' घेतलाय. त्यांनी कानपूरमधील शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. वृद्ध व्यक्तींना तरुण बनवण्याचं स्वप्न दाखवून त्यांनी तब्बल 35 कोटी रुपये गोळा केले आणि फरार झाले. आता पीडित व्यक्तींनी त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांकडं धाव घेतली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कानपूरमधील किदवई नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 'रिवाइल वर्ल्ड' या नावानं एक थेरेपी सेंटर सुरु करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना थेरपी दिली जात असे. या सेंटरमध्ये इस्रायलमधून टाईम मशीन आणण्यात आलं आहे. त्याचा वापर करुन 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 25 वर्षांचा तरुण बनवलं जातं, या गोष्टीचा प्रचार करण्यात आला. किदवई नगरमध्येच राहणारे दुबे दाम्प्त्य या फसवणुकीचे मुख्य सूत्रधार होते.
खराब आणि प्रदुषित हवेमुळे लोकं लवकर म्हातारे होत आहेत. ऑक्सिजन थेरेपीचा वापर करुन त्यांना पुन्हा तरुण करणे शक्य आहे, असा दावा त्यांनी केला होता.
कानपूरमध्ये राहणार्या प्रिन्स गुप्ता यांनी त्यांची फसवणूक कशी झाली याची माहिती NDTV ला दिली. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार 'मला रिवाइल कंपनीच्या योजनेबाबत सांगण्यात आले. कंपनीचे मालक राजीव दुबे यांनी त्यांच्याकडं टाईम मशीन असल्याचं सांगितलं. या मशिनच्या आधारावर व्यक्ती 20 वर्ष तरुण होतो. त्यांनी हे सर्व अगदी खरं वाटेल या पद्धतीनं पटवून दिलं.
( नक्की वाचा : दुबईहून दिल्लीत आले 7 हजार कोटींचे ड्रग्ज, पोलिसांनी कसं पकडलं? कोण होते ग्राहक? )
हे मशीन इस्रायल आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे. ऑनलाईन याप पद्धतीची माहिती देखील उपलब्ध आहे, असं दुबे यांनी पटवून दिलं. त्यामुळे आम्ही यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली.
आरोपींनी पीडित व्यक्तींकडून तब्बल 35 कोटी रुपये गोळा केले आहेत, असा दावा या प्रकरणातील आणखी एक तक्रारदार रेणू यांनी केला आहे. आरोपींनी नकली प्लांट तयार केला होता. कोणतीही ऑक्सिजन थेरेपी दिली नाही. त्यांनी कोट्यवधींची फसवणूक केली अशी त्यांनी तक्रार केली आहे. राजकारणी ते उद्योगपतीपर्यंत अनेकांची फसवणूक करुन हे जोडपं आता परदेशात पळण्याच्या तयारीत आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय.