पती आणि पत्नीच्या वादातून होणारे गुन्हे काही नवीन नाहीत. या प्रकराच्या घटना सातत्यानं उघड होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात मोठी वाढ झालेली दिसत आहे. विशेषत: पत्नीनं पतीची हत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येही एका महिलेनं त्याच्या पतीला मारण्यासाठी कट रचला होता. सर्व तयारी झाली होती. पण... नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बरेलीमधील ही घटना आहे. यामध्ये राजीव असं पतीचं नाव असून त्याला त्याच्या सासरच्यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो शेवटच्या क्षणी बचावला. राजीवच्या हत्येचा कथित कट त्याची पत्नी साधनानेच रचल्याचा आरोप आहे. साधनाने तिच्या पाच भावांची यासाठी मदत घेतली.
भगवान दास, प्रेमराज, हरीश आणि लक्ष्मण अशी साधनाच्या भावांची नावं आहेत. त्यांनी काही गुंडाना सुपारी दिली. 21 जुलैच्या रात्री, एकूण 11 जणांनी राजीववर त्याच्या घरात हल्ला केला. त्यांनी त्याचे हात आणि दोन्ही पाय तोडले. त्याला जिवंत पुरण्याचा त्यांचा कट होता. त्यांनी त्याला सीबी गंज परिसरातील एका जंगलात नेले आणि त्याला पुरण्यासाठी खड्डा खोदला. पण नशिबाचा डाव वेगळाच होता. ते त्याला पुरण्याआधी, एक अनोळखी व्यक्ती तिथे पोहोचली, ज्यामुळे आरोपींना त्यांचा कट अर्धवट सोडून पळून जावे लागले.
( नक्की वाचा : कोर्टातील 'केमिस्ट्रीचा क्लास' वाया, महिला प्राध्यापिकेला पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप )
राजीव तिथेच पडून होता, त्याची हाडे तुटली होती. त्याला मदतीसाठी ओरडताही येत नव्हते. पण त्या अनोळखी व्यक्तीने त्याला पाहिले आणि रुग्णवाहिकेला बोलावले. राजीवला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तो वाचला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
राजीवच्या वडिलांनी, नेतराम यांनी, आपली सून आणि तिच्या भावांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजीव बरेलीच्या नवोदय रुग्णालयात एका डॉक्टरकडे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतो. त्याचे लग्न २००९ मध्ये साधनाशी झाले आणि त्यांना दोन मुले आहेत: यश (14) आणि लव (8), दोघेही एका खाजगी शाळेत शिकतात. त्याचे गावात घर होते, पण तो आणि त्याची पत्नी शहरात राहत होते, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. पत्नीला गावात राहायचे नव्हते म्हणून त्याने शहरात भाड्याने घर घेतले होते, असा दावा त्यांनी केला.