मनोज सातवी, प्रतिनिधी
वसईच्या चिचपाडा परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीवर लोखंडी पान्याचे वार करून तिची हत्या केली आहे. आरती रामदुलार यादव (22 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (29 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. डोक्यात सैतान शिरलेल्या रोहितने आरती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली असतानाही तिच्यावर वार केले.
वसईतल्या या हत्याकांडानं राज्यभर खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. त्यांनी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. रोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे, असं ट्विट फडणवीस यांनी केलंय.
पोलिसांनी लक्ष दिलं असतं तर...
गृहमंत्र्यांनी हत्याकांडानंतर तातडीनं पोलिसांना निर्देश दिले आहेत. पण, त्यांच्याच अखत्यारीतील पोलिसांकडं या प्रकरणात यापूर्वीच तक्रार केली होती. पोलिसांनी गांभीर्यानं दखल न घेतल्यानंच आरतीची हत्या झाली, असा आरोप तिच्या बहिणीनं केलाय.
( नक्की वाचा : 'चल यार दारु पिते है', मित्राला केलेल्या मेसेजमुळे सापडला डोंबिवलीतील वृद्ध महिलेचा मारेकरी )
गेल्या चार-पाच दिवसापासून रोहित आरतीला त्रास देत होता. तिचा मोबाईल देखील रोहितने तोडला होता याप्रकरणी आरती आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार देखील केली होती. मात्र पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळेच आरतीची हत्या झाली, असं तिच्या बहिणीनं सांगितलंय.
प्राथमिक माहिती नुसार एकतर्फी प्रेमातून रोहित यादव याने हे कृत्य केले.रोहित याने तिचा खून केल्यानंतर तो तिच्या मृतदेहा जवळ बसला होता. लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तातडीने पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. मुलीची स्थिती पाहीली तेव्हा तिच्यावर मोठ्या प्रमाणात घाव केले गेले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी लगेचच रोहित याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे तरुणीची हत्या होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.