Virar Murder Case : मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण कारवाईत कुख्यात गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर याला उत्तर प्रदेशातील फतेहगढ़ सेंट्रल जेलमधून ताब्यात घेतले आहे. विरारमधील बिल्डर समय चव्हाण यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडात सुभाष सिंग ठाकूर याचा मुख्य सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.त्याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
26 फेब्रुवारी 2012 रोजी विरारमध्ये बिल्डर समय चव्हाण यांची गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, या भीषण गुन्ह्यामागील खरा सूत्रधार सुभाष सिंग ठाकूर हा असल्याचे निष्पन्न झाले. ठाकूरने स्वतः तुरुंगात असतानाही, शार्प शूटरच्या माध्यमातून चव्हाण यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मीरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी त्यांची कोठडी मिळवली आहे. गुन्हे शाखेचे पथक ठाकूरला घेऊन लवकरच (मंगळवार, 16 डिसेंबर) मीरा रोड येथे पोहोचणार आहे.
( नक्की वाचा : Shocking : 'बाबा बाथरुममधून आले आणि एकापाठोपाठ 5 जणांना लटकवलं', 6 वर्षांच्या मुलानं सांगितला खतरनाक प्रसंग )
दाऊद कनेक्शन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी
गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर याच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरोबर संबंध असल्याचा गंभीर आरोप आहे. त्याच्यावर यापूर्वीच हत्या, अपहरण आणि खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का (MCOCA) आणि टाडा (TADA) अंतर्गतही कठोर कारवाई करण्यात आली आहे. सध्या ते उत्तर प्रदेशातील फतेहगढ़ सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
आजारांचे कारण देत टाळला तुरुंगवास
सुभाष सिंग ठाकूरने आजारांचे कारण देत तुरुंगातील सामान्य जीवन टाळल्याचेही उघड झाले आहे. त्याने किडनी, डोळा आणि पोटासंबंधित आजार असल्याचे सांगून डिसेंबर 2019 पासून वाराणसीच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये तब्बल 5 वर्ष मुक्काम केला होता. मात्र, त्यांना 27 जानेवारी 2025 रोजी पुन्हा फतेहगड सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले होते.
मीरा-भाईंदर पोलीस या कुख्यात गँगस्टरला किती दिवसांची कोठडी घेतात आणि त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडातील आणखी कोणती माहिती उघड होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.