Ghaziabad Sisters Suicide: दिल्लीजवळच्या गाझियाबादमध्ये 12, 14 आणि 16 वर्षांच्या तीन सख्ख्या बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या अंगावर शहारे आणणाऱ्या कृत्यामागील खरे कारण एक ऑनलाईन गेम असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही अल्पवयीन बहिणी गेल्या 5 वर्षांपासून म्हणजे कोरोना काळापासून कोरियन लव्ह गेम या जाळ्यात अडकल्या होत्या. हा गेम कशा प्रकारे मुलांच्या मेंदूवर ताबा मिळवतो आणि त्यांना मृत्यूच्या दारी ढकलतो, याचे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे.
काय आहे कोरियन लव्ह गेमचा सापळा?
कोरियन लव्ह गेम हा कोणताही साधा मनोरंजनाचा खेळ नसून तो एक ऑनलाईन टास्क बेस्ड इंटरएक्टिव्ह गेम आहे. "We are not Indians, we are Koreans" असे या गेमचे मुख्य ब्रीदवाक्य आहे.
हा गेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून पसरवला जातो. या गेममध्ये दुसऱ्या बाजूला बसलेली व्यक्ती स्वतःला एक सुंदर कोरियन किंवा परदेशी नागरिक असल्याचे सांगते. मुलांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीची चर्चा मैत्री आणि प्रेमाच्या अवतीभवती फिरते.
( Shocking News : IT रेड सुरु असतानाच बड्या उद्योगपतीची आत्महत्या, चौकशीत नेमकं काय घडलं? )
जीवघेणे टास्क आणि धमक्या
एकदा का मुलांचा विश्वास बसला की मग त्यांना छोटे छोटे टास्क दिले जातात. सुरुवातीला हे टास्क अत्यंत सोपे असतात, मात्र जसजसा वेळ जातो तसतसे हे टास्क कठीण आणि जीवघेणे होऊ लागतात. खेळाडूने टास्क पूर्ण करण्यास नकार दिला, तर त्याला गंभीर धमक्या दिल्या जातात. यामुळे मुले घाबरतात आणि समोरून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करू लागतात.
( नक्की वाचा : Dombivli News लेकीच्या रक्षणासाठी बाबा धावला, पण मद्यधुंद तरुणांनी अख्खं कुटुंबच फोडून काढलं; डोंबिवली हादरली )
कोरोना काळापासून लागले व्यसन
तपासानुसार, या तिन्ही बहिणींच्या डोक्यात हा मोबाईल गेम इतका भिनला होता की त्या स्वतःची ओळख देखील विसरू लागल्या होत्या. वर्ष 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात जेव्हा शाळा बंद होत्या आणि मुले ऑनलाईन जगात जास्त वेळ घालवू लागली, तेव्हापासून या तिन्ही बहिणी या खेळाच्या जाळ्यात अडकल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही बहिणींनी स्वतःची कोरियन नावे देखील ठेवली होती.
अशा गेमला बळी पडलेल्या मुलांमध्ये अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. यामध्ये वागण्यात अचानक आलेला चिडचिडेपणा, सतत तणावाखाली असणे, शांत राहणे, कुटुंबापासून दूर राहून तासनतास मोबाईलमध्ये हरवून जाणे आणि विचित्र टास्क पूर्ण करण्याचा हट्ट धरणे अशा लक्षणांचा समावेश होतो. पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे आणि त्यांच्या वागण्यातील बदलांकडे लक्ष देणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.