लव्ह जिहाद आणि व्होट जिहादनंतर मुंबईत आता सोसायटी जिहाद सुरु आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. काही मुस्लीम बिल्डर हा जिहाद करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे, असं निरुपम यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे आरोप?
संजय निरुपम यांनी दिलेल्या दाव्यानुसार, सोसायटी जिहाद हा एक धोकादायक ट्रेंड आहे. यामध्ये मुस्लीम बिल्डर पुनर्विकासाच्या नावानं जे प्रोजेक्ट हातात घेतात, त्यामध्ये ते अनधिकृत आणि बोगस पद्धतीनं एक बनावट स्ट्रक्चर जोडून एक मोठा प्रोजेक्ट बनवतात. त्या नव्या स्ट्रक्चरमध्ये मुस्लिमांना वसवण्याचा प्रयत्न करतात.
मी एका बिल्डरचे दोन प्रकरण पुढे आणले आहे. त्यांच्या पॅरेडाईज प्रकल्पात 45 घरं होती. आज पास झाल्यानंतर 95 घरं आहेत. त्यामध्ये एकाच मुस्लीम कुटुंबीयाला 30 घर देण्यात आली आहेत. एसआरएमध्ये एका व्यक्तीला एकच घर देऊ शकतो. तुम्ही इतकं मोठं अलॉट करु शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Fatima Sheikh : पहिल्या मुस्लीम शिक्षिका म्हणून सांगितल्या जाणाऱ्या फातिमा शेख बनावट पात्र? )
ही सर्व घरं फक्त कागदावर आहेत. त्यांच्या नावानं संमत करुन घेण्यात आली आहेत. आता ते दुसऱ्या मुस्लिमांना देऊन इथे मुस्लीम लोकसंख्या वाढवण्याचं षडयंत्र आहे. श्रीशंकर सोसायटीमध्ये 67 घरं होते. त्यामध्ये 60 हिंदू आणि 7 मुस्लीम होते. आता तो 123 घरांचा प्रकल्प झाला आहे. आता 123 मध्ये 60 हिंदू असून बाकी सर्व मुस्लीम झाले आहेत, असा आरोप निरुपम यांनी केला.
हे मुंबईचा चेहरा बदलण्याचे कट-कारस्थान आहे. अनेक मुस्लीम बिल्डर्सनी हाच प्रकार सुरु केला आहे. त्यसाठी मी उपमुख्यमंत्री तसंच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे त्यांना पत्र पाठवलं असून सर्व प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती निरुपम यांनी केला.
मुंबईमध्ये हाऊसिंग जिहादचा प्रकार कसा थांबवायचा प्रयत्न झाला पाहिजे. जोगेश्वरी, ओशिवरा, कुर्ला, मानखुर्द, सायन-कोळीवाडा, वांद्रे, मलाड यासारख्या ज्या भागात मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे, तिथं हे प्रकार आहे.
बिल्डरकडून पैसे घेऊन SRA चे अधिकारी हे काम करत आहेत, या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे, असा आरोप निरुपम यांनी केला.