दर्शन थूगुदीप (Kannada Actor Darshan) आणि पवित्रा गौडा (Pavithra Gowda) हे कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीमधले दोन मोठे चेहेरे सध्या अटकेत आहेत. बंगळुरुमध्ये झालेल्या रेणुका स्वामी हत्या प्रकरणात या दोघांचा हात आहे, असा पोलिसांना संशय आहे. या हत्येची सूई पवित्रा गौडाकडं वळाली आहे. स्वत:च्या सौंदर्याच्या जोरावर अनेक फॅन्सच्या ऱ्हदयात घर केलेल्या पवित्राचा मर्डर मिस्ट्रीशी काय कनेक्शन आहे? हा प्रश्न सध्या सर्वांना पडलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे पवित्रा गौडा?
पवित्रा गौडा ही कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधलं प्रसिद्ध नाव आहे. व्यावसायिक अभिनेत्री असलेली पवित्रानं इन्स्टाग्रामवर स्वत:ची ओळख मॉडल, फॅशन डिझायनर आणि बुटीकची मॅनेजिंग डायरेक्टर अशी केलीय. 'चत्रिगलू सर छत्रिगलू', 'बथास' या सारख्या चित्रपटातून तिनं अभिनय केला आहे.
पवित्रा कन्नड सुपरस्टार दर्शनची गर्लफ्रेंड आहे. दोघं बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दर्शनशी तिचं नाव जोडण्यापूर्वी तिला फारसं कुणी ओळखत नव्हतं. बरेच प्रयत्न करुनही तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मनासारखं यश मिळालं नाही. त्यानंतर तिनं संजय नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं. याच काळात तिचं नाव दर्शनशी जोडलं गेलं.
( नक्की वाचा : अभिनेत्रीला अश्लील फोटो, नाल्यात मृतदेह आणि स्टारला अटक! मर्डर मिस्ट्रीचं रहस्य काय? )
सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चा
पवित्रानं जानेवारी 2024 मध्ये एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली होती. तिनं दर्शनसोबत स्वत:चा फोटो शेअर करुन दोघ जणं बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. 'एक दशक पूर्ण झालं. आणखी बरेच बाकी आहेत. आमच्या नात्याला 10 वर्ष झाली. माझी साथ देण्यासाठी तसंच नेहमी माझ्या पाठिशी उभं राहण्यासाठी धन्यवाद, दर्शन' या पवित्राच्या पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.
यापूर्वी 2017 मध्ये पवित्रानं दर्शनसोबत स्वत:चा प्रोफाईल फोटो शेअर केला होता. तो दर्शनच्या फॅन्सना अजिबात आवडला नाही. मोठ्या टिकेनंतर तिनं तो प्रोफाईल फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकला. 2023 मध्ये पवित्रानं तिची मुलगी आणि दर्शन डान्स करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. पवित्राच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीचा हा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमुळे देखील बराच वाद झाला होता.
रेणूका स्वामी हत्येशी काय कनेक्शन?
रेणुका स्वामीची हत्या 8 जून रोजी बंगळुरुमध्ये झाली. हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. कामाक्षीपाल्यातील नाल्यात या मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत होते. त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांनी ते पाहिलं आणि तातडीनं पोलिसांना माहिती दिली. पोलिस तपासात रेणुका स्वामी चित्रदूर्गचा रहिवाशी असून एका फार्मसी कंपनीत काम करत होता, हे स्पष्ट झालं. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.
या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून त्यांनी ही हत्या दर्शनच्या इशाऱ्यानं केली असल्याचा खुलासा केला. त्यानंतर सुरुवातीला दर्शन आणि त्यापाठोपाठ पवित्रालाही अटक करण्यात आली. या प्रकरणात आत्तापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
रेणूका स्वामी पवित्राचा फॅन होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पवित्राला आक्षेपार्ह मेसेज टाकत होता. तसंच त्याच्याशी लग्न करण्याचा दबाव टाकत होता. पवित्राचा बॉयफ्रेंड दर्शनला हे समजताच त्यानं स्वामीचा काटा काढण्याचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दर्शनच्या इशाऱ्यानंच स्वामीला पहिल्यांदा किडनॅप करण्यात आलं. त्यानंतर त्याची मारहाण करुन हत्या करण्यात आली. या मारहाणीच्या दरम्यान पवित्रा तिथं उपस्थित होती, अशी माहिती आहे. या प्रकरणात दर्शनला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.