Wife Killes Husband : नवऱ्याची हत्या झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडणारी बायको, आपले हात-पाय बांधून दरोडेखोरांनी कसं लुटलं आणि नवऱ्याचा जीव कसा घेतला, याचं अंगावर शहारे आणणारं वर्णन करत होती. तिचा तो रडणारा चेहरा पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पण याच रडण्यामागे एक असं भयानक सत्य दडलं होतं, ज्याचा उलगडा होताच पोलीसही चक्रावून गेले.
थरकाप उडवणारा तो बनाव
समाजमाध्यमांवर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका पुरोहित नावाची महिला आपल्या पतीच्या मृत्यूचा थरार सांगताना दिसत आहे. ती सांगते की, काही सशस्त्र दरोडेखोर घरात घुसले, त्यांनी माझं तोंड दाबलं आणि कपाटातील दागिने-रोख रक्कम मागितली. मी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पतीला मारण्याची धमकी दिली.
माझे हात-पाय बांधले आणि माझ्या समोरच पतीवर वार केले. प्रियांकाने दिलेली ही माहिती इतकी सविस्तर होती की, सुरुवातीला कोणालाही तिच्यावर संशय आला नाही. तिने पोलिसांना सांगितले की दरोडेखोरांनी 3.5 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
( नक्की वाचा : Pune News : 25 लाख रुपये, बुधवार पेठेची रुम आणि एक कपल... रुपाली ठोंबरेंच्या आरोपानं पुण्यात खळबळ! )
गुन्ह्याचे लोकेशन आणि तपासातील वळण
ही संपूर्ण खळबळजनक घटना मध्य प्रदेश राज्यातील आहे. 7 एप्रिलच्या रात्री 28 वर्षांचे मसाले व्यापारी देवकृष्ण पुरोहित यांची त्यांच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती.
प्रियांकाने रचलेला दरोड्याचा बनाव पोलिसांनी तपासायला सुरुवात केली, पण तिथेच तिला ठिगळ लागलं. पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली, तेव्हा प्रियांकाने चोरीला गेल्याचे सांगितलेले सर्व दागिने घरातच लपवून ठेवलेले आढळले. इथूनच पोलिसांचा संशय बळावला आणि एका धक्कादायक प्रेमकहाणीचा उलगडा झाला.
( नक्की वाचा : Pune News : आई की सैतान? 6 वर्षांच्या मुलाचा बादलीत तोंड दाबून जीव घेतला; पुण्यातून बीडला मृतदेह नेला आणि... )
प्रेमसंबंध आणि हत्येची सुपारी
पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली, तेव्हा समोर आले की प्रियांकाचे कमलेश नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी मिळून देवकृष्ण यांना वाटेतून हटवण्याचा कट रचला होता. प्रियांकाने आपल्या पतीची हत्या करण्यासाठी सुरेंद्र भाटी नावाच्या एका कंत्राटी मारेकऱ्याला 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
त्यापैकी 50,000 रुपये तिने आगाऊ दिले होते. हत्येच्या रात्री प्रियांकाने घराचे मुख्य दार मुद्दाम उघडे ठेवले होते. देवकृष्ण झोपेत असताना मारेकऱ्याने घरात शिरून त्यांच्यावर वार केले. हा गुन्हा दरोडा वाटावा म्हणून प्रियांकाने स्वतःच घरातील सामानाची उचकापाचक केली होती.
कौटुंबिक छळ आणि काळा रंग
देवकृष्ण यांच्या बहिणीने, ज्योतीने प्रियांकाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रियांका सतत देवकृष्ण यांचा अपमान करायची. तू दिसायला काळा आहेस, तू माझ्या लायकीचा नाहीस, मला तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकतो, असे बोलून ती त्यांना मानसिक त्रास द्यायची. 2010 पासूनच प्रियांकाचे कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय कुटुंबाला होता.
ती सतत फोनवर व्यस्त असायची आणि पतीशी भांडण करायची. आता देवकृष्ण यांच्या वृद्ध आईने आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.