प्रतिक राठोड, प्रतिनिधी
Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने अतिशय भयानक कट रचला. गाढ झोपेत असलेल्या पतीला जिवंत मारण्यासाठी पत्नीने जे पाऊल उचलले, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. पांगडी गावातील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील पीडित पती गजानन मोरे यांना त्यांच्या पत्नीचे गावातीलच विष्णू कडू अत्राम नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे घरात सतत वाद होत होते. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीला कायमचे संपवण्यासाठी पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू या दोघांनी मिळून 3 मे च्या रात्री एक जीवघेणा सापळा रचला.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
घटनेच्या दिवशी 3 मे रोजी रात्री 2 च्या सुमारास गजानन मोरे आपल्या घरात गाढ झोपेत होते. हीच संधी साधून पत्नीने एक ॲल्युमिनियमची तार विजेच्या मुख्य प्रवाहाला जोडली आणि तिचे दुसरे टोक झोपलेल्या नवऱ्याच्या शरीराला लावले. विजेचा जोरदार धक्का बसताच गजानन मोठ्याने ओरडत जागे झाले. या भयानक प्रकारात त्यांच्या दोन्ही हातांच्या दंडाला गंभीर जखमा झाल्या असून ते भाजले गेले आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते थोडक्यात बचावले.
सावध नवऱ्यामुळे आरोपींचे बिंग फुटले
या घटनेनंतर गजानन यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून घरातील विजेच्या तारा आणि ॲल्युमिनियमची तार जप्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर 8 मे रोजी आरोपी पत्नी कवडी मोरे आणि तिचा प्रियकर विष्णू अत्राम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे करत आहेत. प्रेमसंबंधांसाठी स्वतःच्या कुंकवाचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पत्नीच्या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.